राज ठाकरेंना आजोबांची आठवण; ठाकरेंच्या नव्या पिढीला मात्र प्रबोधनकारांचा विसर

राज ठाकरेंना आजोबांची आठवण; ठाकरेंच्या नव्या पिढीला मात्र प्रबोधनकारांचा विसर

प्रबोधनकार ठाकरे, त्यांचे नातू राज ठाकरे आणि पणतू आदित्य ठाकरे

शिवसेना संघटना स्थापन होत असताना संघटनेला नाव काय द्यायचे यावरून बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्यात चर्चा सुरु होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव सुचवले होते. प्रबोधनकार ठाकरे यांची आज १३४ वी जयंती. यानिमित्ताने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी प्रबोधनकारांना अभिवादन करणारी पोस्ट ट्विटर आणि फेसबुकवर टाकली आहे. दुसऱ्याबाजुला शिवसेनेच्या नव्या पिढीला मात्र प्रबोधनकारांचा विसर पडला की काय? अशी शंका उत्पन्न होत आहे. कारण आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेनेच्या सोशल मीडियावर आज प्रबोधनकार यांची जयंती असल्याची कोणतीही पोस्ट पडलेली नाही.

सामनातून अभिवादन

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाने मात्र प्रबोधनकार यांना अभिवादन केले आहे. थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, वादविवादपटू, प्रभावी वक्ते, झुंजार पत्रकार असा प्रबोधनकारांचा उल्लेख करत अभिवादन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे फेसबुक आणि ट्विटर प्लॅटफॉर्मवर असले तरी ते फारसे सक्रीय नसतात. मात्र आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सोशल मीडियावर बऱ्यपैकी सक्रिय आहेत. नुकतेच आरेबाबत दोघांनीही व्हिडिओ पोस्ट करुन आपापल्या भूमिका मांडल्या होत्या. मात्र आपल्या पणजोंबांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट त्यांनी टाकलेल्या नाहीत.

राज ठाकरेंचे सोशल मीडियावर अभिवादन

“पत्रकारिता, ग्रंथलेखन, वक्तृत्व, इतिहास संशोधन आणि प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधणारे आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ह्यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.

 

प्रबोधनकार ठाकरे हे पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते मानले जातात. महात्मा जोतीराव फुलेंना आपला आदर्श मानत त्यांनी लोकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रबोधनकारांच्या विचारांना आजही मानतात.

कोण होते प्रबोधनकार ठाकरे?

कै. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगडमधील पनवेल येथे झाला होता. सामाजिक सुधारणा हे ठाकरेंचे ध्येय होते. त्यामुळे त्यांनी महात्मा फुले यांचा प्रबोधनाचा वारसा पुढे सुरु ठेवला. अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता यावर त्यांनी कठोर प्रहार केले.
कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामज्ञांचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथ प्रबोधनकार यांनी लिहिले. तसेच खरा ब्राह्मण आणि टाकलेले पोर ही दोन नाटके लिहून त्यांनी समाज सुधारणेचे क्रांतिकारक पाऊल उचलले. २० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचे दुःखद निधन झाले.

First Published on: September 17, 2019 4:49 PM
Exit mobile version