प्लास्टिक उद्योजकांकडे निवडणुकीसाठी फंडाची मागणी – राज

प्लास्टिक उद्योजकांकडे निवडणुकीसाठी फंडाची मागणी – राज

‘प्लास्टिक बंदी करण्यापूर्वी प्लास्टिक उद्योजकांकडे निवडणुकीसाठी फंडाची मागणी केली’ असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. शिवाय, एखाद्याला आलेला अचानक झटका म्हणजे धोरण नव्हे अशा शब्दात राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना लक्ष्य केले आहे. सरकारला प्लास्टिक बंदी करायची असेल तर सरसकट का नाही केली? तर, प्लास्टिक बंदी हा निर्णय एका व्यक्तीचा आहे का? मुख्यमंत्र्यांनी याबद्दल अद्याप एकही शब्द का काढला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, महापालिका जबाबदारीमधून हात झटकत असून सामान्य माणसाला वेठीला धरले जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. प्लास्टिक बंदी लागू करण्यापूर्वी लोकांना काही पर्याय दिले गेले का? कचरा कुंड्यांची व्यवस्था केली का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी प्लास्टिक बंदीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. तसेच प्लास्टिक वापरल्यास ५ हजार रूपये दंड आकारणे चुकीचे असून सामान्य नागरिक पैसे खिशामध्ये घेऊन फिरतो का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, राज्यभरात लागू करण्यात आलेली प्लास्टिक बंदी ही कोणत्याही नियोजनाशिवाय करण्यात आली असून, कचऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करा असे देखील राज ठाकरे यांनी सरकारला सांगितले आहे.

प्लास्टिकला पर्याय नाही

दरम्यान, प्लास्टिकला अद्यापतरी पर्याय उपलब्ध नाही. नाशिकमध्ये मनसेच्या नगरसेवकाने प्लास्टिकचा वापर करून इंधन तयार केले. मग सरकारी पातळीवर असा पर्याय का उपलब्ध होत नाही? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. तर, प्लास्टिक वापरताना नागरिकांनी देखील काळजी घ्या. ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपला परिसर देखील स्वच्छ ठेवायला हवा असे आवाहन राज ठाकरे यांनी नागगिकांना केले आहे.

नात्यामध्ये भांडणे नकोत

काक पुतण्याला केव्हापासून घाबरायला लागला? असा सवाल रामदास कदमांनी राज ठाकरेंना केला होता. त्यावरून राज ठाकरेंनी रामदास कदमांना नात्यांमध्ये तुम्ही भांडणे लावण्याची कामे करू नका असा सल्ला दिला आहे.

रवींद्र मराठेंवरील कारवाई आकसाने

डी. एस. कुलकर्णी प्रकरणामध्ये महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्याविरोधात झालेली पोलीस कारवाई आकसाने झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर जाहीर झाली. पण, प्रत्यक्षात लाक्ष का मिळाला नाही, याबद्दल रवींद्र मराठे चौकशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे आणि त्याच आकसापोटी ही कारवाई झाली आहे. शिवाय, पोलीस कारवाईच्या आडून महाराष्ट्र बँकेचे बडोदा बँकेमध्ये विलीनीकरण करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. रवींद्र मराठेंवर कारवाई करता मग चंदा कोचर, अमित शहा आणि पंजाब बँकेबद्दल कारवाई करताना सापत्नभाव का? असा खडा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे.

First Published on: June 26, 2018 2:17 PM
Exit mobile version