गड-किल्ल्यांपेक्षा तुमच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या – राज ठाकरे

गड-किल्ल्यांपेक्षा तुमच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज्य सरकारच्या गड-किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून टीका होत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. सरकारला उत्पन्नच मिळवायचे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या गड-किल्ले धोरणावर खरपूस टीका केली. गड किल्ल्यांना हात लावाल तर परिणाम दिसतील, असा इशाराही राज ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याच पार्शवभूमीवर शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस डोंबिवली मुक्कामी आहेत. निवडणुकीच्या चाचपणीसाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. राज हे सकाळी ११ वाजत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार होते. मात्र दुपारी ३ वाजता डोंबिवलीत पोहचल्याने रविवारी सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.


हेही वाचा – गुंतवणूक न करताही राज ठाकरेंना २० कोटींचा नफा? ईडी बुचकळ्यात


 

नेमके काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र सरकारला याचे काहीच देणेघेणे नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत. त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत.’ ‘भाजप मशीनच्या मदतीने निवडून येत आहे. त्यामुळे ते लोकांना विचारातही घेत नाहीत’, असेही राज म्हणाले.

राज यांना खड्ड्यांचा फटका

राज ठाकरे हे डोंबिवलीत येण्यापूर्वी एमएसआरडीसीने कल्याण शीळ रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र तरीही राज यांना कल्याण शीळ रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका सहन करावा लागला. राज यांचा ताफा काही वेळ काटई नाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला होता. प्रथम त्यांनी मनसे नेते राजू पाटील यांच्या भावाच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

First Published on: September 7, 2019 9:05 PM
Exit mobile version