राज ठाकरे यांची अनपेक्षित माघार, महाआरत्या केल्या रद्द, भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करणार

राज ठाकरे यांची अनपेक्षित माघार, महाआरत्या केल्या रद्द, भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करणार

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात ठिकठिकाणी महाआरती करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रद्द केला केला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ट्वीट करत या निर्णयाची माहिती दिली. तसेच मशिदींवरील भोंग्याबाबत पुढे काय करायचे याविषयी मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे राज यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभर महाआरती करण्याचे जाहीर केले होती. राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली होती. काल, रविवारी औरंगाबादेत सभा झाल्यानंतर मनसेकडून महाआरतीची तयारी सुरू करण्यात होती. मात्र, आज महाआरती रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. राज ठाकरे यांच्या अनपेक्षित माघारीने आज राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होती.

‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्या बाबतीत मी बोललो आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी उद्या आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढेच!,” असे राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मुंबई आणि ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरे पुण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी तीन कार्यक्रम जाहीर केले होते. यात औरंगाबाद येथील सभा, अयोध्या दौरा आणि अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते.

पोलीस राज ठाकरे यांचे भाषण तपासणार : गृहमंत्री

प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही. रविवारी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे आणि दोन समाजामध्ये भावना भडकतील याचाच प्रयत्न केला. राज यांचे कालचे भाषण पोलीस ऐकतील. त्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह आहे किंवा कसे याबाबत अंतिम निर्णय पोलीस महासंचालक घेतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज खोडद (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्थींचे उल्लंघन केले आहे का, याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले, यासंदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहतील. त्यात अटीशर्तींचे कुठे कुठे उल्लंघन झाले याचा आढावा घेतील. कायदेशीर सल्ला घेऊन अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर त्याबाबत पोलीस महासंचालक निर्णय घेतील, असे वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, वळसे पाटील यांनी सामाजाला शांतता आणि सलोखा ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणी तेढ निर्माण करीत असेल तर त्यांना साथ देऊ नका, असे वळसे-पाटील म्हणाले.


हेही वाचा : चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारुन महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होऊ देणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

First Published on: May 2, 2022 7:41 PM
Exit mobile version