मनसेचे हम साथ साथ है कोणाबरोबर? अमृता फडणवीसांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर

मनसेचे हम साथ साथ है कोणाबरोबर? अमृता फडणवीसांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या परखड आणि रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांची राज्याच्या कोणत्याही भागात सत्ता नसली तरी आणि संपूर्ण राज्यात एकच आणदार असला तरी राज्याच्या राजकारणात त्यांचा वेगळात प्रभाव आणि दबदबा आहे. राज ठाकरे हे राजकारणातील असे व्यक्तीमत्त्व आहे, ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातील लोक येत असतात. आज (ता. 26 एप्रिल) लोकमत वृत्तसमुहातर्फे राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सडेतोड प्रतिक्रीया देण्यात आल्या.

“मला न्यूज चॅनलवरुन कळतं. तुम्ही कधी राष्ट्रवादीच्या जवळ दिसता, कधी शिवसेना तर तर कधी भाजपला टाळी देता. आता हम साथ साथ है कोणाबरोबर आणि केव्हा करणार?” असा प्रश्न अमृता फडणवीस यांच्याकडून राज ठाकरे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला राज ठाकरे यांनी गोड बोलत सडेतोड उत्तर दिले. तर देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये केलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून त्यांनी यावेळी टोला लगावला.

हेही वाचा – ‘सत्तेचा साबण खूप वेगळा असतो’, नेत्यांवरील छापेमारीवर राज ठाकरेंचे स्पष्ट मत

अमृता फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “काय आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून बोलत नाही आहातच. तर आता मी बोलूनच टाकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही सध्या कोणाबरोबर आहेत तेच कळत नाही. कारण काय, ते पहाटेच गाडी घेऊन करुणाकडे जातात. मग तुम्हाला कित्येकदा पत्ता नसतो. कधीतरी ते शिंदेंबरोबर असतात. कधीतरी अजित पवारांचा चेहरा उतरलेला दिसतो. कुणाला भेटणं, बोलणं ही बातमी झालीय. राजकारणातला मोकळेपणा मीडियाने घालवला. त्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कुणी कुणाला भेटलं तर युती आणि आघाडी होत नसतात.”

राज ठाकरे यांच्या या उत्तरामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देत “ते खूप लॉयल आहेत” असे अमृता फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

First Published on: April 26, 2023 9:06 PM
Exit mobile version