राज ठाकरेंचा वाढदिवस, कुछ तो हटके बनता है बॉस!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५०वा वाढदिवस! साहेबांचा वाढदिवस म्हटला की सेलिब्रेशन एकदम हटके स्टाईलने झाले पाहिजे! अगदी अशाच हटके पद्धतीने राज ठाकरेंनी आपला वाढदिवस साजरा केला आहे. ५०व्या वाढदिवसानिमित्त श्रीहरी अणे, नाणार आणि ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असलेला केक कापत राज ठाकरेंनी वाढदिवस साजरा केला. यावेळी कृष्णकुंजवर हजारो मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या नावाचा जयजयकार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

‘ते’ केक कापण्यामागचा अर्थ काय?

राज्यातील प्रत्येक प्रश्नावर राज ठाकरे भूमिका मांडत आले आहेत. भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांसह राज ठाकरेंनी वेळोवेळी केला आहे. भाजप जिंकल्यानंतर ‘ईव्हीएम की जय हो!’ अशी प्रतिक्रिया देखील राज ठाकरेंनी दिली. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी ईव्हीएमचा केक कापत सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कोकणातल्या प्रस्तावित नाणार प्रकल्पाला कोकणातून टोकाचा विरोध होत आहे. कोकणातील जनता ‘नाणार हटाव कोकण बचाव’चा नारा देत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी कोकणचा दौरा केला त्यावेळी नाणार प्रकल्पावरून भाजपसह शिवसेनेवर देखील जोरदार हल्ला चढवत नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. शिवाय स्थानिकांचा विरोध असताना निसर्गरम्य कोकणात विनाशकारी ऑईल रिफायनरी प्रकल्प का? असा सवाल सरकारला विचारला होता. तसेच कोकणातील ‘परब जाऊन अरब येतील’ अशा प्रतिक्रिया देखील दिली होती. वाढदिवशी नाणार प्रकल्पाचा केक कापत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ता पदाचा राजीनामा देत वेगळ्या विदर्भाचा राग आळवला होता. त्यावरून राज ठाकरे आणि श्रीहरी अणे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. वेगळ्या विदर्भाला विरोध करत वाढदिवशी देखील राज ठाकरे यांनी श्रीहरी अणे आणि पर्यायाने वेगळ्या विदर्भाला आपला विरोध कायम असल्याचे दर्शवले आहे.

निवडणूक प्रचारात तापणार ‘ते तीन’ मुद्दे?

लवकरच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी राज्यातल्या काही भागांचा दौरा करत पक्ष बांधणीचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी पक्ष बांधणीला महत्त्व दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. वाढदिवशी राज ठाकरेंनी श्रीहरी अणे, नाणार आणि ईव्हीएम मशीनचा केक कापत आगामी निवडणुकांमध्ये या तीन मुद्यांवर सरकारवर टीका करण्याची रणनिती आखल्याचं बोललं जात आहे.

First Published on: June 14, 2018 8:06 AM
Exit mobile version