राज्यात लवकरच कठोर निर्बंध, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात लवकरच कठोर निर्बंध, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या एक दोन दिवसात कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

लग्न तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यााबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून निश्चितच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि टास्क फोर्सचे सदस्य यांची बैठक घेतली. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या, ओमायक्रॉनचे संकट, लसीकरण आदी विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, राज्यातील बेडची संख्या, उपलब्ध औषधे याविषयीही चर्चा झाली. सध्या उपलब्ध असलेल्या पेरिवीर औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश मुुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. टास्क फोर्सच्या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झाल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ८ टक्क्यांवर पोहोचला आहे. एका दिवसात दुप्पट होणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय उपाय करावेत, काय निर्बंध लादणे गरजेचे आहे याबाबत चर्चा झाली, असे टोपे म्हणाले. ओमायक्रॉनचे लवकर निदान व्हावे यासाठी एसजीडीएफ कीट उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुढील काही दिवसांत हे किट उपलब्ध होतील. या किटच्या माध्यमातून गुरुवारी जे पॉझिटिव्ह येत आहेत त्यामध्ये डेल्टा किती आणि ओमायक्रोन किती येतात त्याचा तातडीने निर्णय होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी दिली.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी तूर्तास शाळा सुरूच राहिल्या पाहिजेत हा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेत लस न देता मुलांना लसीकरण केंद्रांवर नेऊन लस द्यावी, असा विचार पुढे आला आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रावर क्लिनिकल टूर काढून मुलांना बसने नेले जावे, अशी चर्चा झाली. त्याला मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

First Published on: December 31, 2021 4:16 AM
Exit mobile version