राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट, शेतकरी आंदोलनाच्या रणनीतीवर होणार चर्चा 

राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट, शेतकरी आंदोलनाच्या रणनीतीवर होणार चर्चा 

केंद्र सरकारने घोषित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाची ठिणगी आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते आणि बीकेयुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे येत्या ९ जून रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. तीन सदस्यीय शिष्टमंडळासह राकेश टिकैत कोलकाताला जाऊन ही भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान पुढील शेतकरी आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी आंदोलन हे २०२४ पर्यंत सुरू राहील, असे वक्तव्य राकेश टिकैत यांनी शुक्रवारी आपल्या वाढदिवसानिमित्त केले होते. केंद्र सरकारला तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, अशी ठाम भुमीका टिकैत यांनी मांडली. कोणत्याही परिस्थितीत देशातील शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढेल आणि कृषी कायद्यांविरोधातील आपले आंदोलन सुरूच ठेवेल, अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.

केंद्राने कृषी कायदे रद्द करावेत यासाठी शेतकरी कडाक्याच्या थंडीत देखील दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक दिवस ठाण मांडून बसले होते. या दरम्यान आंदोलनाने तीव्र रूप धारण केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन काहीसे शांत झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाची तयारी दर्शवली आहे. यासाठी ते ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

 

 

First Published on: June 7, 2021 10:53 AM
Exit mobile version