मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त न करता आग्रह धरला पाहिजे, नाना पटोलेंना रामदास आठवलेंनी दिला सल्ला

मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त न करता आग्रह धरला पाहिजे, नाना पटोलेंना रामदास आठवलेंनी दिला सल्ला

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आता मुख्यमंत्रीपदाबाबत सूर उमटत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ३ घटक पक्षांचा समावेश आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसकडे प्रमुख पद नाही आहे. पक्ष श्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास स्विकारेल असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फक्त इच्छा व्यक्त करुन चालणार नाही तर काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भ दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकाही स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास स्विकारेल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर मविआ सरकार पडेल. काँग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरला पाहिजे जर त्यांना सीएम पद दिले जात नसेल तर काँग्रेस ने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा असे माझे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आवाहन आहे. अशा आशयाचे ट्विट रामदास आठवले यांनी केलं आहे.

नाना पटोले यांनी सध्या पाच वर्ष महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरेच असतील असे म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदाच्याबाबत कोणाताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील आणि याला काँग्रेसचा संपुर्ण पाठिंबा राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: June 14, 2021 10:55 PM
Exit mobile version