घरवापसी झालेल्या रमेश पवारांकडे पुन्हा मुंबई मनपा सहआयुक्त पदाचा भार

घरवापसी झालेल्या रमेश पवारांकडे पुन्हा मुंबई मनपा सहआयुक्त पदाचा भार

मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र अद्यापही सुरूच आहे. त्यातच ठाकरे सरकारच्या कालावधीत बढती घेऊन ६ महिन्यांपूर्वी नाशिक महापालिका आयुक्तपदी आरूढ झालेले मुंबई महापालिकेतील रमेश पवार यांची राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे सरकारच्या काळात एका महिन्यापूर्वीच घरवापसी झाली आहे. मात्र महत्वाच्या पदाच्या प्रतिक्षेत असलेले रमेश पवार यांच्याकडे आता पुन्हा एकदा सहआयुक्त (सुधार) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या पदाची धुरा सांभाळणारे केशव उबाळे यांच्याकडे आता उपायुक्त (दक्षता) विभागाची जबाबदारी सोपवविण्यात आली आहे. तसेच, सनदी अधिकारी सह आयुक्त अजित कुंभार यांच्याकडे केवळ शिक्षण विभाग ठेवण्यात आला आहे.
राज्यात अडीच वर्षांपूर्वी शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील नेते व तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील तब्बल ४९ बंडखोर आमदारांनी भाजपशी सूत जुळवून राज्यात सत्ता मिळवली. त्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेतून बढती घेऊन
नाशिक महापालिका आयुक्तपदी आरूढ झालेले रमेश पवार यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली.

त्यांच्या जागी चंद्रकांत पुलकुंडवार यांची नाशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे रमेश पवार जे पुन्हा मुंबई महापालिकेत परतले. मात्र ते लगेचच सुट्टीवर गेले होते. दरम्यान, त्यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे आपली पालिकेत योग्य पदावर नियुक्ती करण्याची विनंती केली होती. मात्र एका महिन्यानंतर त्यांच्याकडे सह आयुक्त (सुधार) या पदाचा कार्यभार पुन्हा सोपविण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, पालिकेत सनदी अधिकारी सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडे शिक्षण आणि दक्षता या दोन विभागाचा पदभार होता. त्यातील दक्षता विभाग हा उबाळे यांच्याकडे सोपवून कुंभार यांच्याकडे केवळ शिक्षण विभाग ठेवण्यात आला आहे. तसेच, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचे अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे.


हेही वाचा : मुंबईच्या सुशोभीकरणाची कामे महापालिकेने वेळेत पूर्ण करावीत, मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश


 

First Published on: September 13, 2022 10:36 PM
Exit mobile version