राणी बागेची आता ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ ही नवी ओळख

राणी बागेची आता ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ ही नवी ओळख

मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध राणी बागेचे म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे करण्यात आले आहे. यासंदर्भातील ठराव पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासक म्हणून आपल्या अधिकारात मंजूर केला आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक लांबली आहे. त्यामुळे सध्या पालिकेत नवीन महापौर, उपमहापौर, पालिका सभागृह नेते नाहीत. पालिका सभा, स्थायी समिती, सुधार समिती यांच्या बैठका होत नाहीत. पालिकेची संपूर्ण जबाबदारी ‘प्रशासक’ म्हणून आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे आली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकारात हा नामकरणाचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांनी याबाबतच्या ठरावाची प्रत पालिका चिटणीस संगीता शर्मा यांना माहितीसाठी पाठवली आहे.

मुंबईतील काही मोजक्या पर्यटनस्थळांपैकी एक व पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणजे भायखळा येथील राणीची बाग. 14 जानेवारी 1980 रोजी पालिकेने ठराव क्रमांक 1,742 अन्वये राणीच्या बागेचे ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे नामकरण केले होते. आता या ठरावातील आदेशात अंशतः फेरफार करून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय’ असे नव्याने नामकरण करण्यात आले आहे. त्यास मुंबई महापालिका 1888च्या कलम 6 क (1) अन्वये प्रशासक म्हणून स्वतःच्या अधिकारात पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मंजुरी दिली आहे.

राणी बाग प्राणी संग्रहालयाचा इतिहास
मुंबई महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे (पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया गार्डन) उद्घाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 1862 रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. हे उद्यान महापालिकेकडे सुपूर्द झाल्‍यानंतर एक सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महापालिकेने स्‍वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनसामान्‍यांच्‍या विशेषतः बच्चे कंपनीच्या विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. गेल्या पाच–सहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात 70 टक्क्यांपेक्षाही जास्त कामे पार पडली असून तिसऱ्या व अंतिम टप्प्याची कामे सुरू आहेत.

या ठिकाणी विदेशातून पेंग्विन, विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱया पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. या प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव मागील वर्षभर निरनिराळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यामध्ये, शतकोत्तर हीरक महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण, पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालयात आकर्षक आसने/ बैठक व्यवस्था, विद्यार्थ्‍यांसाठी हेरिटेज वॉक, गांडूळखत विक्री तसेच प्राणिसंग्रहालयाच्‍या विविध समाजमाध्यम (सोशल मीडिया) अॅपचे क्यूआर कोड प्रदर्शन यासारख्या काही उपक्रमांचा उल्लेख करता येईल.

First Published on: December 15, 2022 8:46 PM
Exit mobile version