दानवेंचा ‘अतिरेकी’ म्हणणारा व्हिडिओ खोटाच!

दानवेंचा ‘अतिरेकी’ म्हणणारा व्हिडिओ खोटाच!

रावसाहेब दानवे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते भारतीय सैनिकांना ‘अतिरेकी’ म्हणत असल्याचं दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ मॉर्फ्ड करून, त्याची मोडतोड करून व्हायरल केला जात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मूळ व्हिडिओ आता समोर आला असून त्यात दानवेंनी ‘सैनिक’ असाच उल्लेख केला आहे. पण, एरवी खऱ्याखुऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनी टिकेचे धनी ठरणारे दानवे यंदा मात्र नाहक सोशल ट्रोलिंगचे धनी ठरले. अखेर पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक पत्रक काढून दानवेंची बाजू स्पष्ट केली आहे.

दानवे म्हणाले ४० अतिरेकी मारले?

सकाळपासून रावसाहेब दानवेंचा हा व्हिडिओ व्हायरल केला जात होता. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विट देखील केला. या व्हिडिओमध्ये रावते ‘तीन दिवसांमध्ये त्यांनी आपले ४० अतिरेकी मारले’ असं म्हणत असल्याचं दिसत आहे. मात्र मूळ व्हिडिओ काहीतरी वेगळंच सांगतो.

मूळ व्हिडिओतून सत्य झालं स्पष्ट

खरंतर दानवेंनी सोलापूरमध्ये झालेल्या सभेदरम्यान हे वक्तव्य केलं होतं. त्यानी म्हटलं होतं, ‘३ दिवसांमध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानात जाऊन त्यांनी आपले ४० सैनिक मारले. पण आपल्या जवानांनी तिथे ४०० अतिरेकी मारले. आणि हे दाखवून दिलं की आमचं सैन्य काही कमी नाही’. मात्र, मॉर्फ्ड व्हिडिओची पुरेशी शहानिशा न करताच तो व्हिडिओ व्हायरल करून त्यावरून टिकेची झोड उठवली गेली.


वाचा दानवेंचं वादग्रस्त वक्तव्य – मोदीविरोधात देशभरातले तर माझ्या विरोधात जालन्यातील चोट्टे एकत्र

‘पॉजचा केला दुरुपयोग’

त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रक काढून बाजू स्पष्ट केली आहे. ‘भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या वक्तव्याचा बनावट व्हिडिओ तयार करून त्यांची बदनामी करण्याचा आपण धिक्कार करतो. प्रसिद्धीमाध्यमांनी या व्हिडिओबाबत शहानिशा करावी आणि बनावट व्हिडिओ तयार करून बदनामी करण्याच्या कारस्थानाला बळी पडू नये. बोलताना घेतलेल्या पॉजचा दुरुपयोग करून बनावट व्हिडिओ तयार करून बदनामीचा प्रयत्न करण्यात आला’, असं केशव उपाध्येंनी या पत्रकार म्हटलं आहे.

First Published on: March 25, 2019 9:55 PM
Exit mobile version