दानवे म्हणाले ‘जावई पडल्याचं नसेल, तेवढं दु:ख खैरे पडल्याचं’

दानवे म्हणाले ‘जावई पडल्याचं नसेल, तेवढं दु:ख खैरे पडल्याचं’

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणूकीत निसटता पराभव झाला. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले आहेत. खैरे यांना 384550 , जलील यांना 389042 मते मिळाली. याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी येथून अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यांना 283237 मते मिळाली व ते तिसऱ्या स्थानावर राहिले. जाधव उभे राहिले नसते, तर खैरेंना मिळणाऱ्या मतांची विभागणी टळली असती. पण तसे न होता खैरेंना पराभव पत्करावा लागला.


हे ही वाचा‘दानवेंनी जे केलंय ते मनाला लागलं’; सेनेच्या खैरेंची खदखद

               औरंगाबादेत चौरंगी लढतीमध्ये खैरेंची परीक्षा


आज खैरे यांच्या पराभवानंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले की जावई पडल्याचे दु:ख नाही तेवढे दु:ख चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाचे आहे.’ निकालापूर्वी चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जावयाला मदत केल्याचे आरोप केले होते. त्यामुळे आपण अडचणीत आलो असून दानवेंनी युतीचा धर्म पाळला नसल्याचेही खैरे म्हणाले होते. ऐन प्रचाराच्या काळातच आजारी पडल्यानंतर रावसाहेब दानवेंनी ९ दिवस औरंगबादच्या एका खासगी रूग्णालयात उपचार घेतले होते. मात्र आजारपणाच्या नावाखाली त्यांनी औरंगाबाद लोकसभेच्या जागेवर उभे असलेल्या जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोपही झाला होता. या पार्श्वभूमीवर आज दानवे यांनी खैरेंबद्दल केलेले वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यात सर्वात मोठं नाव होतं ते चंद्रकांत खैरे. अगदी मंत्रीपदाचे दावेदार म्हणून खैरे यांच्याकडे पाहिलं जातं होतं. पण, वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी त्यांचा दारुण पराभव केला.  त्यामुळे गुरुवारी चंद्रकांत खैरे आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्री वर दाखल झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान पराभवानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर टिका केली आहे. या विजयानंतर औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा रझाकारी सुरू झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ‘माझं नशिब खराब असल्यामुळे माझा पराभव झाला आहे. पण, मी काम करत राहणार असंही ते म्हणाले.

First Published on: May 24, 2019 2:40 PM
Exit mobile version