विकृतीचा कळस! ९ वर्षांच्या मुलावर अत्याचार; आरोपीला कोठडी

विकृतीचा कळस! ९ वर्षांच्या मुलावर अत्याचार; आरोपीला कोठडी

नाशिक शहरात मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शनिवारी (दि.१३) रात्री ८ वाजेदरम्यान ९ वर्षांच्या मुलास मोबाईल व पैशांचे आमिष दाखवत एका नराधमाने उत्कर्षनगर येथील सार्वजनिक शौचालयात नेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी संजय शंकर मिसाळ (४५, रा. उत्कर्षनगर, पीटीसीसमोर, त्र्यंबक रोड) यास अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळत असताना संजय मिसाळ याने त्यास जवळ बोलवले. त्यास मोबाईल व पैशांचे आमिष दाखवत सार्वजनिक शौचालयात नेले. या ठिकाणी त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर ‘कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन’ अशी धमकी त्याने मुलास दिली. ही बाब त्याच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी मिसाळवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार (पोस्को) गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक बैसाणे यांनी मिसाळ त्यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

First Published on: June 15, 2020 2:09 PM
Exit mobile version