बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे

बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे

राजकारणात विजय आणि पराभव होत असतो. पण आता पक्ष संपवण्याची भाषा केली जात आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना हा संपत चालल्याचे म्हटले आहे. त्यांना माहिती नाही की, शिवसेनेने अशी आव्हाने पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवलाय. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरे गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. आता आपली लढाई तीन पातळ्यांवर सुरू आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई न्यायालयात सुरू आहे आणि तिसरी लढाईही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे शपथपत्राची. हा विषय खूप गंभीर आहे. तेव्हा शपथपत्रे गोळा करा, सदस्य नोंदणी करा, या लढाईत खंबीरपणे पाय रोवून उभे राहा, असे आवाहन शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसैनिकांना केले.

जळगाव आणि वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले की, आता तुम्ही शपथपत्रांचे गठ्ठे आणले आहेत, तसेच गठ्ठेच्या गठ्ठे मला हवे आहेत. मागील महिनाभर मातोश्रीवर सातत्याने गर्दी होत आहे. आमची लढाई दोन ते तीन पातळ्यांवर सुरू आहे. पहिली लढाई ही रस्त्यावरील आहे. दुसरी न्यायालयीन पातळीवर सुरू आहे, तर तिसरी लढाई ही निष्ठेसोबतची आहे.

रस्ता आणि कागदावरच्या लढाईत आम्ही मागे पडणार नाही. या कायद्याच्या लढाईत माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. वकील योग्य बाजू मांडत आहेत, परंतु तिसर्‍या लढाईचा विषय खूपच गंभीर आहे. सध्या ज्यांना मी मोठे केले, ते आपल्यासोबत नाहीत, पण त्यांना मोठे करणारे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमच्याच ताकदीवर आपण त्यांना धडा शिकवू, पण आज निक्षून सांगतो की, आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पाहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.

भाजपचा वंश नेमका कोणता?
भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे काही रेडिमेड आणि हायब्रीड आहे. भाजपवाले वंश विकत घेत आहेत. राजकारणात हारजीत होत असते. कधी कुणाचा पराभव तर कुणाचा विजय होतो, पण एखाद्या पक्षालाच संपवण्याचे प्रयत्न याआधी झाले नव्हते. ते आता होत आहेत. आताही शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधीही झाले होते. परवा भाजपच्या अध्यक्षांनी सांगूनच टाकले की, शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हाने पायदळी तुडवून भगवा झेंडा रोवला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना टोला लगावला.

First Published on: August 4, 2022 5:10 AM
Exit mobile version