अनेक वर्ष रखडलेला सिंधी कॉलनीचा पुनर्विकास सुरू

अनेक वर्ष रखडलेला सिंधी कॉलनीचा पुनर्विकास सुरू
ठाणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना ७५ वर्षांपूर्वी सिंधमधून निर्वासित झालेल्या कोपरीतील २०० सिंधी कुटुंबांचे इमारतीतील घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. कोपरीत पुनर्वसित सिंधी भाषिकांची भव्य इमारत साकारणार असून महाराष्ट्रात प्रथमच होत असलेल्या या प्रकल्पामुळे सिंधी बांधवांच्या अन्य इमारतींच्या विकासाचा मार्गही मोकळा झाला.
भारताच्या विभाजनानंतर कोपरीत सिंधी बांधवांची वसाहत वसविण्यात आली होती. त्यातील छोट्या-छोट्या बराकींमध्ये कुटुंबांना जागा देण्यात आल्या. कालांतराने या ठिकाणी छोट्या इमारती उभारल्या गेल्या. या इमारतींना ४० ते ५० वर्षे पूर्ण झाल्यावर पुनर्विकासाची आवश्यकता होती. मात्र, त्यात अनेक तांत्रिक बाबींचा अडथळा येत होता. त्यामुळे सिंधी बांधवांना जुन्या इमारतीत नाईलाजाने राहावे लागत होते. त्याला कंटाळून अनेक कुटुंबे दुसऱ्या जागी राहावयास गेली होती.
सिंधी वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी हाती घेतला. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह नगरविकास विभाग, ठाणे महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. या इमारतींच्या पुनर्विकासातील त्रूटी दूर करण्यात आल्या. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर जय मॉं को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या इमारत क्र. १५ चा प्रस्ताव प्रथम तयार करण्यात आला. या इमारतीत २०० कुटुंबे राहत होती. त्या २०० रहिवाशांची बैठक झाल्यानंतर त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर रहिवाशांनी पुनर्विकासाला मान्यता दिली. त्यानंतर  शनिवारी प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले.
सिंधी कॉलनीतील कुटुंबांना घर निश्चित मिळेल- भरत चव्हाण
सिंधी कॉलनीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. इमारत क्र. १५ चा पुनर्विकास हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्याच धर्तीवर इतर इमारतींचा विकास करण्यात येईल. येत्या काही वर्षांत विस्थापित झालेल्या प्रत्येक सिंधी कुटुंबाला भव्य इमारतीमध्ये हक्काचे घर उपलब्ध होईल. त्यांना कोपरीबाहेर पडावे लागणार नाही, अशी ग्वाही माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली.
First Published on: December 4, 2022 7:22 PM
Exit mobile version