एमपीएससीतून सरकारी नोकरीच्या खुल्या व ओबीसी वर्गाच्या संधी कपात

एमपीएससीतून सरकारी नोकरीच्या खुल्या व ओबीसी वर्गाच्या संधी कपात

उमेदवारांकडे 'या' प्रकारचं मास्क अनिवार्य; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी परीक्षा ही राज्य सरकारमध्ये उच्च पदस्थ सरकारी नोकरी मिळवण्याचा एक मार्ग होता. एमपीएससीने ३० डिसेंबरला केलेल्या घोषणेनुसार खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी मर्यादित केल्या आहेत. यामध्ये खुल्या वर्गासाठी ६ तर ओबीसी वर्गासाठी ९ संधी देण्यात आल्या आहेत. संधी कमी केल्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीला मुकावे लागणार असल्याचे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

एमपीएससीकडून घेण्यात येणार्‍या परीक्षांमधून विद्यार्थ्यांना सरकारच्या विविध खात्यांमध्ये उच्चपदस्थ नोकरी मिळवण्याची संधी असते. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आयोगाकडून घेण्यात येणार्‍या परीक्षांची तयारी करत असतात. अनेक विद्यार्थी नोकरीनंतरही या परीक्षेची तयारी करत असतात. आतापर्यंत खुल्या वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा वयाच्या ३८ व्या तर ओबीसी वर्गातील विद्यार्थी ४१ वर्षापर्यंत देऊ शकत होते. मात्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या परिपत्रकानुसार खुल्या व ओबीसी वर्गाच्या संधी मर्यादित केल्या आहेत. त्यानुसार खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना फक्त सहा वेळा तर ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना नऊ वेळाच ही परीक्षा देता येणार आहे. अनुसुचित जमाती व अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. विशेष म्हणजे उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाणार आहे. त्याचप्रमाणे एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास ती सुद्धा संधी समजण्यात येणार आहे. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती सुद्धा त्याच्या परीक्षेची संधी समजली जाणार आहे. परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा निर्णय २०२१ मध्ये प्रसिद्ध होणार्‍या परीक्षांच्या जाहिरातीपासून लागू होणार आहे.

First Published on: December 30, 2020 8:25 PM
Exit mobile version