नारायण राणेंना दिलासा, ठाकरेंवरील टिपण्णीबाबतचा गुन्हा अखेर रद्द

नारायण राणेंना दिलासा, ठाकरेंवरील टिपण्णीबाबतचा गुन्हा अखेर रद्द

तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केल्याच्या प्रकरणात केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना अलिबाग न्यायालयाने काल शनिवारी (ता. १ एप्रिल) मोठा दिलासा दिला. या प्रकरणातील नारायण राणे यांच्याविरोधातील गुन्हा अखेर रद्द करण्यात आला आहे. अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी तसे निर्देशच दिल्याने नारायण राणे यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिपण्णी केल्याच्या या प्रकरणात नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी राणे यांना अटकदेखील करण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली होती. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि त्यानंतर आता जवळपास ९ महिन्यांच्या कालावधीनंतर नारायण राणे यांच्या विरोधातील या प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यात आलेला आहे.

काय होते प्रकरण?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावेळी नारायण राणे हे महाड येथील पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, “मी असतो तर त्यांच्या कानशिलातच वाजवली असती.” त्यांच्या या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. राणेंविरोधात राज्यभरात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच, पुणे, नाशिक, महाड, धुळे, अहमदनगर आणि जळगाव येथे आयपीसी कलम 500, 505 (2), 153 ब (1) (क) नुसार गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणामध्ये राज्यातून तक्रारी दाखल होऊ लागल्याने नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, त्यांच्याकडून एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती. तर असे विधान करून समाजात तेढ करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यावेळी नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले होते. नारायण राणे यांनी त्यावेळी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा राज्यात पाहायला मिळाला होता.


हेही वाचा – पोलिसांच्या अटीशर्तींसह छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची आज जाहीरसभा

First Published on: April 2, 2023 10:15 AM
Exit mobile version