टेंडर आणि स्टॉकिस्ट पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होणार – टोपे

टेंडर आणि स्टॉकिस्ट पद्धतीने रेमडेसिवीरचे वाटप होणार – टोपे

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाली असून या परिस्थितीत बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काळाबाजारात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री होत असल्याचे अनेक प्रकार राज्यात उघडकीस आलेत. यामुळे जाग आलेल्या राज्य सरकारने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी टेंडर आणि स्टॉकिस्ट अशा दोन पद्धतीनी या औषधाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात खासगी कोविड रुग्णालयांना दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

टोपे म्हणाले, रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन करणार्‍या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीने हाफकीन कंपनी सरकारच्या वतीने टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करेल आणि शासकीय रुग्णालयांना पुरवठा करेल. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण असल्याने काळाबाजार होणार नाही. यातून खासगी रुग्णालयांना सहज रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल. रेमडेसिवीरचा टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे योग्य पध्दतीने वापर केल्यास इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

हवेतीलऑक्सिजन शोषून घेणार्‍या प्लांटची उभारणी
सध्या ऑक्सिजनची कमतरता असून जालन्यातील घनसावंगी येथे येत्या १५ दिवसांत हवेतील पूर्ण ऑक्सिजन शोषून घेणारा प्लांट उभारला जात असून यात यश मिळाले तर संपूर्ण राज्यात असे प्लांट उभे करता येतील आणि लिक्विड ऑक्सिजनला पर्याय मिळेल, याकडे टोपे यांनी लक्ष वेधले.

First Published on: April 15, 2021 4:15 AM
Exit mobile version