डीएसकेंचा धडा वगळा, हेमंत टकलेंची मागणी

डीएसकेंचा धडा वगळा, हेमंत टकलेंची मागणी

राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठामध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये यशस्वी उदयोजक म्हणून डी.एस.कुलकर्णी यांच्यावरचा धडा समाविष्ट केलेला आहे. हा धडा तात्काळ वगळण्यात यावा आणि पुस्तकाचे पुर्ननिरिक्षण करुन ते पुस्तक बदलण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी केली आहे.

अटकेत असूनही डीएसकेंची ‘यशोगाथा’

यशोगाथा नावाच्या पुस्तकात डीएसकेंचा हा धडा आहे. त्यामध्ये वास्तु उदयोगातील अग्रणी डीएसके यांची यशोगाथा दिलेली आहे. हे पुस्तक १५ जून २०१३ ला प्रकाशित करण्यात आले आणि तेव्हापासून ते अभ्यासक्रमात आहे. त्यानंतरचा काळ बघितला तर डीएसके यांच्यावर गुंतवणूकदारांना फसवल्याचे गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले आहेत. त्यामध्ये ते अटकेतही आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची यशोगाथा प्राध्यापक काय शिकवणार आणि डिएसकेंबद्दल विदयार्थी काय अभ्यास करणार? असा सवालही हेमंत टकले यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, याचा अर्थ सावित्रीबाई फुले विदयापीठाच्या शिक्षण अभ्यासक्रमात २०१३ पासून २०१८ पर्यंत बदल करण्यात आला नाही. हे सर्व अनागोंदी कारभाराचं लक्षण आहे. त्यामुळे कुलगुरुंनी यावर त्वरीत कार्यवाही करावी. अभ्यासक्रमाची सर्व जबाबदारी विदयापीठाच्या कुलगुरु आणि राज्याच्या शिक्षण खात्यावर आहे. चुकीच्या पध्दतीने शिक्षणाचे धडे पुढच्या पिढीला दिले जाणार असतील तर किती हजार तरुणांना फसवण्यासाठी नवउदयोजक तयार होतील याची कल्पनाच न केलेली बरी अशी भीती आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

अभ्यासक्रमाचे राजकारण नको

आपल्या मागणीबाबत सविस्तर बोलताना टकले म्हणाले की, प्रश्न एका धड्याचा नाही. सत्ता बदलली की, सत्ताधाऱ्यांना हवा असलेला बदल शिक्षणव्यवस्थेत केला जातो. पण हे करत असताना भावी पिढीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. हा काही राजकीय विषय नसून विदयार्थ्यांची पिढी घडवण्याच्या संदर्भात आहे. त्याबाबतीत घडणारा हा विषय खेदजनक असून त्यावर त्वरीत कारवाई झाली पाहिजे शिवाय त्या पुस्तकाची मान्यता काढून घेतली पाहिजे आणि त्या जागी तातडीने नवीन पुस्तक अभ्यासमंडळाकडून मान्य करुन ते अभ्यासक्रमात आणले पाहिजे अशी मागणीही आमदार हेमंत टकले यांनी यावेळी केली.

First Published on: July 4, 2018 8:25 PM
Exit mobile version