Lockdown : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण कळवा लॉकडाऊन!

Lockdown : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे संपूर्ण कळवा लॉकडाऊन!
गेल्या काही दिवसात ठाण्यातील सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण हे कळवा प्रभाग समिती क्षेत्रात आढळून आले आहे. त्यामुळे कळवा प्रभाग समितीतील सर्व विभाग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मेडीकल व रूग्णालये दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. कळव्यातील पारसिक नगर, मनिषा नगर, विटावा अशा वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
सोमवारी ठाण्यातील वृंदावन व कळव्यातील विटावा भागात कोरोनाचा आणखी एक पॉझिटीव्ह  रूग्ण आढळला. त्यामुळे ठाण्यातील कोराेनाग्रस्तांची संख्या २२ झाली आहे. त्यात कळव्यातील सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यामुळेच पालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत.  गर्दी करू नका, घरातच बसू राहावे असे, आवाहन पालिका प्रशासनाकडून वारंवार करूनही नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खासगी वाहनांवरही बंदी घातली होती. मात्र, तरीसुध्दा नागरिक दुचाकी व चारचाकीने फिरताना आढळून आले आहेत.  त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने कळवा संपूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील मेडीकल, रूग्णालये व दवाखाने उघडी ठेवण्यात येणार असून भाजीपाला विक्री किराणा दूध आदी दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. नागरिकांना भाजीपाला अथवा इतर जीवनावश्यक वस्तू हवे असतील तर पालिकेच्यावतीने काही फोन नंबर दिले आहेत. त्यावर फोन करून घरपोच सेवा मिळवता येणार आहे. त्यामुळे कळव्यातील नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही. नागरिकांनी घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
First Published on: April 7, 2020 2:41 PM
Exit mobile version