खेड पत्रकार मारहाण प्रकरण; पत्रकार बेमुदत उपोषणावर

खेड पत्रकार मारहाण प्रकरण; पत्रकार बेमुदत उपोषणावर

खेडमध्ये पत्रकारांचं उपोषण

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध बातमी देणाऱ्या पत्रकारांवर काही समाजकंटकांनी गेल्या आठवड्यात हल्ला केला. याप्रकरणी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारे गांभीर्याने दखल न घेतल्याने खेड शहरातील सर्व पत्रकारांनी खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. संबंधित आरोपींविरुद्ध मोका कायदा लावून त्यांना तडीपार करण्यासोबतच आतापर्यंत गुन्हेगारांविरूध्द ठोस पावले उचलण्यासंदर्भात कुचराई करणाऱ्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीची मागणी देखील उपोषणकर्त्या पत्रकारांनी लावून धरली आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असून सिद्धेश परशेट्ये, अनुज जोशी आणि अजित जाधव हे या उपोषणस्थळी बेमुदत आंदोलन करण्यास बसले आहेत. आज सायंकाळी अनुज जोशी यांची प्रकृती अस्थिर झाल्याने त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने १०८ ॲम्बुलन्सने पाठवण्यात आले आहे.

‘गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा’

रोजच खेड शहरासह अनेक पत्रकारांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी उपोषणस्थळी राबता सुरू आहे. आज चौथ्या दिवशी शैलेश पालकर यांनी उपोषणकर्त्या पत्रकारांना पाठिंबा दर्शवताना तातडीने खेड शहर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची बदली करण्याची मागणी केली आहे. यासोबतच संबंधित गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पत्रकार या ठिकाणच्या आमदारांना खेड शहरातील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या आणि हल्लेखोरांना अभय देणाऱ्या पोलीस निरीक्षक पत्की यांच्याविरोधात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवण्यासाठी आवाहन करणार आहेत.

यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील ‘पोलिसांनी वेळीच गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली असती तर पत्रकारांवर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याची वेळ आली नसती’, असे मत व्यक्त करून खेड नगराध्यक्ष म्हणून पोलिसांच्या या कचखाऊ भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

First Published on: June 23, 2019 8:48 PM
Exit mobile version