प्रसंगी भाजप खासदारपदाचा राजीनामा देईन – संभाजीराजे मराठा समाज आरक्षण

प्रसंगी भाजप खासदारपदाचा राजीनामा देईन –  संभाजीराजे मराठा समाज आरक्षण

राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी प्रसंगी भाजप खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. सोलापुरात सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे राज्याच्या दौर्‍यावर आहेत.

संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे सोमवारपासून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या २७ मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.

मराठवाडा आणि खान्देशात जाऊन संभाजीराजे समाजाची भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो; पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

First Published on: May 25, 2021 6:10 AM
Exit mobile version