महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद, कार्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून मदतीचा ओघ

महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद, कार्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून मदतीचा ओघ

मुंबई महानगरपालिका

‘कोरोना’च्या संकटाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी केलेल्या आवाहनाला विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांनी प्रतिसाद देत मास्क, सॅनिटायझर तसेच हातमोजे आदी वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.  त्यामुळे या मदतीचा ओघ आता अधिकच वाढू लागला असून यासर्व वस्तूंचे भांडार आता अंधेरी येथील राजे शहाजी क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. याठिकाणांहून मागणीनुसार सर्व महापालिकेच्या रुग्णालयांसह महापालिकेच्या कार्यालयांना या वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशात विशेष काळजी घेतली जात असून या साथीच्या आजाराची भीषण पाहता सरकार तसेच महापालिकेने विविध मोठ्या कंपन्या तसेच संस्थांना देणगी स्वरुपात वस्तूंचे वाटप करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विविध मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेत मुंबई महापालिकेला मोठ्याप्रमाणात सॅनिटायझर्स, मास्क तसेच हातमोजे आदी वस्तुंसह इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याप्रमाणे गोदरेज, ऑबेरॉय तसेच आर.पी.जी आदी कंपन्यांसह विविध संस्थांनी अशाप्रकारच्या वस्तू देणगी स्वरुपात महापालिकेला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने आधीच अशाप्रकारच्या वस्तू खरेदी केल्यामुळे मुबलक प्रमाणात साठा आहे. तरीही या आजाराने भीषण स्वरुपात पायहाय पसरल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, ही भीती लक्षात घेता अशा कंपन्या आणि संस्थांकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे या आजाराचा सामना करणे महापालिकेला अधिक सोपे जाईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कंपन्या आणि संस्थांकडून दरदिवशी मदतीचा ओघ वाढतच आहे. त्यामुळे यासर्व वस्तू एकाच मध्यवर्ती ठिकाणी अर्थात अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलात एकत्र गोळा करून तेथूनच सर्व रुग्णालय व महापालिकेच्या कार्यालयांना पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी संपर्क साधला असता, मोठ्याप्रमाणात देणगी स्वरुपात वस्तू महापालिकेला दिल्या जात आहेत. यासर्व वस्तू राजे शहाजी क्रीडा संकुलातील गोदामात एकत्र गोळा करून प्रत्येक रुग्णालयांच्या मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. आयुक्तांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भविष्यातील आव्हानांच्या दृष्टीने सुसज्जतेसाठी वैद्यकीय साधने व यंत्रे देणगी स्वरूपात देण्याचे महापालिकेचे आवाहन

व्हेंटिलेटर, पीपीई, सॅनिटायज़र्स, ग्लोव्हज़, मास्क, इत्यादी देणगी स्वरूपात देता येणार आहे.

‘कोरोना कोविड १९’च्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरू

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सदैव सजग असणारी आपली बृहन्मुंबई महापालिका सध्या ‘करोना कोविड १९’ या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने व अथकपणे करीत आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह चार प्रमुख रुग्णालये, सोळा उपनगरीय रुग्णालये आणि १७४ दवाखाने येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, उप वैद्यकीय कर्मचारी इत्यादी अक्षरश अहोरात्र कार्यरत असून सदैव सजग व सुसज्ज आहेत.

 

‘करोना कोविड १९’ बाधित रुग्णांना अव्याहतपणे सातत्यपूर्ण सेवा देत असलेल्या या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर संसर्ग झालेल्या रुग्णांची देखील परिपूर्ण काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. *करोना संसर्गाची व्यापकता लक्षात घेता व भविष्यातील आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करण्याच्या तयारीचा व सुसज्जतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्हेंटिलेटर, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ अर्थात पी. पी. ई., सॅनीटायझर, ग्लोव्हज, मास्क इत्यादी वस्तूंच्या स्वरूपात देणगी देण्याचे आवाहन महापालिकेने यापूर्वीच केले आहे.

 

या अनुषंगाने अनेक कॉर्पोरेट हाऊसेस, दानशूर संस्था वा व्यक्ती यांनी यापूर्वीच स्वतःहून पुढे येऊन वैद्यकीय साधने व यंत्रे यांची देणगी दिली आहे. त्यांच्या या सकारात्मक व स्वयंस्फूर्त भूमिकेचे स्वागत करतानाच महापालिकेने त्यांच्या या सामाजिक दायित्वाच्या भावनेबाबत शतशः ऋण व्यक्त केले आहे.

 

तथापि, भविष्यातील आव्हानांच्या संभाव्य व्यापक तेच्या पार्श्र्वभूमीवर आता महापालिकेने दानशूर संस्था व नागरिकांना वस्तू स्वरुपात देणगी देण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. देणगी म्हणून देणे अपेक्षित असलेल्या वस्तूंमध्ये प्रामुख्याने व्हॅंटिलेटर, पी. पी. ई., सॅनिटायझर, ग्लोव्हज़, मास्क इत्यादी वैद्यकीय साधनांचा समावेश आहे.

 

वरील अनुषंगाने दानशूर संस्था व व्यक्तींनी आपल्या वस्तू स्वरूपातील देणगीची नोंदणी महापालिकेच्या खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Link : http://stopcoronavirus.mcgm.gov.in/help-mumbai-combat-covid19

किंवा

Link : https://bit.ly/39rG7JK

 

First Published on: March 29, 2020 5:33 PM
Exit mobile version