कच्च्या लोखंडाची वाहतूक पुन्हा सुरू

कच्च्या लोखंडाची वाहतूक पुन्हा सुरू

स्थानिकांच्या विरोधानंतर रोहे रेल्वे यार्डातून बंद झालेली कच्च्या लोखंडाची वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला हानी पोहचविणारी ही वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.

पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीला मोठ्या प्रमाणात कच्चे लोखंड लागत असल्याने ते अन्य ठिकाणाहून रेल्वे वॅगनने उलट्या दिशेला रोहे येथे येऊन १० ते १६ टायरच्या ट्रकमधून ४० किलोमीटर अंतरावरील या कंपनीत जाते. जेएसडब्ल्यूला पेण रेल्वे स्टेशन जवळ असताना लोखंडी विषारी कच्चा माल लांबच्या अंतरातील रेल्वे यार्डात का आणला जातो आणि तेथून पुन्हा उलट दिशेने त्याची पेणकडे वाहतूक का केली जाते, असा सवाल यातून अनेकदा विचारला गेला आहे. वॅगन रिकामी होताना आणि ट्रकमध्ये कच्चे लोखंड भरताना त्यातून प्रचंड प्रमाणात भुकटी हवेत उडत असते. स्वाभाविक रोहे रेल्वे स्थानक परिसरातील गावांवर एक प्रकारचे ढगाळलेल्या वातावरणासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यातून खोकला, श्वसानाचे विकार, सर्दी, डोकेदुखी यासारखे आजार उद्भवतात. त्यामुळे या वाहतुकीला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. यासाठी प्रांत, तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.

स्थानिक जनतेच्या तीव्र विरोधानंतर काही दिवसांपूर्वी ही वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र हे समाधान औटघटकेचे ठरले असून, पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कच्च्या लोखंडाची वाहतूक सुरू झाली आहे. ही वाहतूक सुरू होण्यासाठी कुणाचे आशीर्वाद मदतीला आले, यावर आता खमंग चर्चा देखील सुरू झाली आहे. जनतेच्या हिताची सदैव ‘काळजी’ करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी गावांवर पुन्हा एकदा प्रदूषणाची ‘काजळी’ पसरत असताना मूग गिळून गप्प का, असा सवाल जनता विचारू लागली आहे.

दरम्यान, जेएसडब्ल्यूकडे होणार्‍या वाहतुकी प्रमाणेच रोहे शहरापासून काही अंतरावरील यशवंतखार येथील इंडो एनर्जी जेट्टीवरून होणार्‍या कच्च्या लोखंडाच्या वाहतुकीमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. असे असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ मिठाची गुळणी घेऊन बसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना आता याबाबत आक्रमक भूमिका घेणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: December 7, 2019 1:45 AM
Exit mobile version