निवृत्त शिक्षकांना मिळाली ‘दिवाळी’ भेट

निवृत्त शिक्षकांना मिळाली ‘दिवाळी’ भेट

प्रातिनिधिक फोटो

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेतील शाळांमध्ये तब्बल २४ वर्ष सेवा केलेल्या ५६ निवृत्त प्राथमिक शिक्षकांना यंदा अनोखी ‘दिवाळी भेट’ मिळाली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील अनेकवर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा निर्णय ‘दिवळी भेट’ असल्याचे सांगितल्या जात आहे.

निवडश्रेणी मिळवण्यासाठी शिक्षकांचा पाठपुरावा

गेल्या काही वर्षांपासून निवडश्रेणी मिळविण्यासाठी शिक्षकांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे प्रस्ताव मंजूर होत नव्हता. या संदर्भात काही निवृत्त शिक्षकांनी आमदार निरंजन डावखरे यांना विनंती केली होती. त्यानंतर आ. डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. या प्रकरणी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
या विषयावर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून मुंबईत रायगड जिल्हा परिषद व महाड नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात संबंधीत शिक्षकांच्या प्रस्तावाची तपासणी करण्यात आली. तसेच या शिक्षकांची २४ वर्षांची अर्हताकारी सेवा समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्यावर पात्र निवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले. या शिक्षकांना ऐन दिवाळीतच ही गोड बातमी मिळाली.

First Published on: November 9, 2018 8:29 PM
Exit mobile version