युती झाल्याने परस्परांविरोधी तक्रारी मागे घ्या

युती झाल्याने परस्परांविरोधी तक्रारी मागे घ्या

Shivsena Bjp

शिवसेना आणि भाजपची लोकसभा-विधानसभेसाठी युती झाल्यानंतरही अजून दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांमधील कटुता कमी झाली नाही. विधानसभा निवडणूक असो वा महापालिका सार्वत्रिक निवडणूक असो, यामध्ये निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवारांनी तक्रारी केल्या आहेत, पण युती झाली तरी या तक्रारी कायम आहेत. दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांना त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता युती झालीच आहे, तर किमान या तक्रारी मागे घेण्यात याव्यात, असा सूर दोन्ही पक्षांतील विजयी उमेदवारांकडून आळवला जात आहे.

शिवसेना-भाजपची आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली असली तरी मागील विधानसभा आणि महापालिका सार्वत्रिक निवडणूक त्यांनी स्वबळावर लढवली. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांविरोधात तसेच नगरसेवकांविरोधात दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवारांनी पोलीस ठाण्यांसह अन्य ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात जात प्रमाणपत्राव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम तसेच अन्य प्रकारच्या तक्रारी केलेल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत दहिसर मतदारसंघातून शिवसेनेचे विनोद घोसाळकर आणि भाजपच्या मनिषा चौधरी यांच्यात लढत झाली होती, परंतु प्रचारादरम्यान वाहनामध्ये पैसे आढळून आल्यामुळे घोसाळकर यांनी आमदार चौधरी यांच्याविरोधात तक्रार नोंदवून त्यांना उमेदवार म्हणून निवडणूक लढू देऊ नये, अशी मागणी केली होती. तब्बल चार वर्षे ही याचिका सुरू होती. मुंबई हायकोर्टाने चार दिवसांपूर्वी ही याचिका फेटाळून चौधरींच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे विजयानंतर चौधरी यांनी सत्याचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

युती झाल्यानंतर, या याचिकेचा निर्णय लागला असला तरी एकमेकांविरोधात ठाकलेल्या सेना आणि भाजपच्या उमेदवारांनी तक्रारी केल्याने अनेक आमदार आजही मानसिक त्रास सहन करत आहेत. घाटकोपरमधील शिवसेना नगरसेवक सुरेश पाटील यांच्याविरोधात भाजपच्या पराभूत उमेदवार रितू तावडे यांनी हायकोर्टात याचिका करून तक्रार केली आहे. त्यामुळे पाटील यांना अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. तावडे यांच्या तक्रारीमुळे पाटील यांच्यावर अपात्र ठरण्याची टांगती तलवार आहे. शिवसेनेच्या पाटील यांच्याप्रमाणे भाजपचे मुरजी पटेल यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे युती झाल्याने आता किमान एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारी मागे घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षा या सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेचे सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,
आतापर्यंत जो मानसिक त्रास आम्ही भोगत आहोत, तो कमी होईल, अशी आशा आहे. युती झाल्याने किमान ज्या तक्रारी भाजपच्या उमेदवारांनी केलेल्या आहेत, त्या त्यांनी मागे घ्याव्यात हीच अपेक्षा आहे. या तक्रारी मागे घेतल्यास युतीतील कटुता निर्माण करणारे प्रसंग कमी होऊन गोडवा निर्माण होईल.
– सुरेश पाटील, नगरसेवक, शिवसेना

First Published on: February 26, 2019 4:28 AM
Exit mobile version