सावित्री पुलावरील खडीमुळे वाहनांच्या अपघाताचा धोका

सावित्री पुलावरील खडीमुळे वाहनांच्या अपघाताचा धोका

मुंबई-गोवा महामार्गावर येथील सावित्री पुलावर बारीक खडी पडल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. महामार्ग चौपदरीकरणातील खडी वाहतूक करणार्‍या वाहनांतून ही खडी पडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे तीनतेरा झाले आहेत. पुलाच्या देखभालीची जबाबदारी महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदारावर सोपवून हात वर केले आहेत. पुलावरील दिवेदेखील गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. त्यातच आता महामार्ग चौपदरीकरण कामासाठी वाहतूक केली जाणारी खडी वाहनांतून या पुलावर पडल्याने दुचाकी आणि वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दुतर्फा साईडपट्टीवर खडीचा खच पडल्याने वाहने घसरण्याची शक्यता असते. याबाबत महामार्ग बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत आहे.

दोन वर्षापासून या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न अनुत्तरीत आहे. पुलावरील स्वच्छता केली जात नसल्याने प्लास्टिकचे तुकडे, छोटे दगड आणि वाहनातून पडणारी खडी तशीच पडून राहत आहे. महामार्गाच्या कामासाठी पुलाजवळच सिमेंट मिश्रण प्लांट उभा करण्यात आला आहे. महामार्ग चौपदरीकरण करणार्‍या ठेकेदाराने हा प्लांट उभा केला आहे. सिमेंट मिश्रणाची वाहतूक केली जात असताना ही खडी पडत आहे.

पुलाच्या बाजूपट्टीवर पडलेल्या खडीने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
-इफ्तिकार काळसेकर, स्थानिक नागरिक

First Published on: January 22, 2020 1:06 AM
Exit mobile version