करोना विसरा; रस्ते अपघातात ९ महिन्यात ७,३१० जणांचा मृत्यू!

करोना विसरा; रस्ते अपघातात ९ महिन्यात ७,३१० जणांचा मृत्यू!

अपघात

संपूर्ण जगाने सध्या करोनाची धास्ती घेतली आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही करोनाचा शिरकाव झाला आहे. करोनाच्या भितीने राज्यातील जनता धास्तावली असून रोज नवनवीन अफवांना पेव फुटत आहे. करोनावर उपचार नाहीत, त्यामुळे लोकांना भीती वाटत असली तरी करोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातात होत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या काळात राज्यातील रस्त्यावर विविध कारणांनी २४ हजार २६२ अपघात झाले असून त्यामध्ये ७ हजार ३१० लोकांचा मृत्यू झालेला आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लेखी उत्तर दिले आहे.

अपघातांत १० टक्क्यांची घट

मद्यपान, निष्काळजीपणे वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन इत्यादी कारणांमुळे अपघात वाढले आहेत का? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना देशमुख यांनी २०१८ च्या तुलनेत २०१९ साली रस्ते अपघातात १० टक्क्यांची घट झाल्याचे सांगितले. तसेच अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वेग मर्यादेचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, असे देखील या उत्तरात म्हटले आहे.

करोनापेक्षा रस्ते अपघात मारक?

करोना विषाणूमुळे चीनसह अनेक देशांत चार हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे करोनाची अनेकांनी धास्ती घेतली आहे. मात्र, करोना रोगामुळे मृत्यूदर केवळ २ ते ३ टक्के आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. करोनाची भीती जेवढी बाळगली जात आहे, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.


हेही वाचा – करोनाच्या नावाखाली सुट्टया घेणे पडले महाग, जेलमध्ये रवानगी!

रस्त्यांवर स्पीड डिटेक्टर कॅमेरे!

रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी सरकारने ११ मुद्द्यांवर काम सुरु केले आहे. यात प्रामुख्याने रस्ते क्रॅश अॅनालिसीस सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तर वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाईसाठी स्पीड डिटेक्टर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रोड सेफ्टीबद्दल प्रबोधन, वाहतूक आणि अपघाताची माहिती देण्याकरता हेल्पलाईन नंबर आणि एमटीपी अॅप सुरु करण्यात आले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले असल्याचे लेखी उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

First Published on: March 12, 2020 4:53 PM
Exit mobile version