बिल्डरसाठी रोहे पालिकेची तत्परता !

बिल्डरसाठी रोहे पालिकेची तत्परता !

शहरातील शिवाजीनगरमधील सुस्थितीत असलेले सार्वजनिक शौचालय नगर पालिकेने जमीनदोस्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता पाडकाम झाल्याने स्थानिकांनी पत्राद्वारे याबाबत प्रशासनाला जाब विचारला आहे. तर दुसरीकडे बिल्डरशी संगनमत करून शौचालय पाडले असल्याचा आरोप करीत तसे निषेधाचे फलकच परिसरात लावण्यात आले आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासन शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करीत असताना येथे मात्र उलटेच घडले आहे. शहरात अनेक वर्षांपूर्वीची काही सार्वजनिक शौचालये आहेत. शिवाजीनगरमधील हे शौचालयही त्यापैकी एक होते. त्या परिसरात असलेली अन्य दोन शौचालये अडचणीच्या जागी आहेत. त्यांच्या साठवणूक टाक्या साफ करता येत नाहीत. तसेच यापैकी एक तर जंगलालगत असून, सर्पांचा सतत वावर असल्याने नागरिक भयभीत होऊन तेथे जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना सोयीचे असे हे एकमेव व मोक्याच्या जागी असलेले शौचालय होते. पूर्वसूचना न देता ते जमीनदोस्त केल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत.

भूसपाट करण्यात आलेल्या या शौचालयाची चार-पाच महिन्यांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे ते पाडायचे होते मग दुरुस्ती का केली, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. शौचालय पाडण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट का केले गेले नाही, तोडायचे होते तर मग दुरुस्ती का केली, असे सवाल उपस्थित करतानाच हे स्थानिक नगरसेवकांनी बिल्डरच्या फायद्यासाठीच केल्याचा थेट आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी प्रशासनाला पत्र लिहून त्याच जागी शौचालय बांधून द्यावे, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा दिला आहे.

सदर शौचालयाची दुरवस्था झाली होती. त्याचे सर्व फोटो आम्ही काढून ठेवले आहेत. त्यामुळे ते जमीनदोस्त केले. मात्र त्या शौचालयाची दुरुस्ती का केली होती, ते पहावे लागेल.
-बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी, नगर पालिका

एका बिल्डरच्या फायद्यासाठी नागरिकांना सोयीचे असलेले शौचालय जमीनदोस्त केले. आम्ही तेथील रहिवाशांच्या बाजूने आहोत. पालिकेने तातडीने त्याच ठिकाणी शौचालय बांधावे. दुसरे शौचालय जंगलालगत असून तिथे वीज नाही. आजूबाजूला सापांचा वावर असल्यामुळे जर एखादी दुर्घटना अथवा जीवितहानी घडली तर त्यास पालिका जबाबदार असेल.
-समीर शेडगे, शिवसेना रोहे तालुकाप्रमुख

First Published on: July 21, 2019 4:14 AM
Exit mobile version