छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी, रोहित पवारांचा राज्यपालांवर घणाघात

छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी, रोहित पवारांचा राज्यपालांवर घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करत राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

आज औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. बोलताना कोश्यारी म्हणाले की, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो, तेव्हा आम्हाला शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण? त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र बोस, कोणाला पंडित जवाहरलाल नेहरू, तर कोणाला गांधीजी चांगले वाटायचे. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेव्हरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही, महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील, शिवाजी महाराज जुन्या काळातली गोष्ट आहे. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यभरातून निषेध होतोय. महाराजांची तुलना राजकीय नेत्यांशी करणं चुकीचं असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी देखील राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरुनही राज्यात गदारोळ झाला होता.


हेही वाचा : राज्यपालांनी छत्रपती शिवरायांची थेट पवार, गडकरींशी केली तुलना; म्हणाले ‘हेच सध्याचे आदर्श


 

First Published on: November 19, 2022 6:04 PM
Exit mobile version