Rohit Pawar : हेच का तुमचे देशप्रेम? रोहित पवारांचा राज्य सरकारला सवाल

Rohit Pawar : हेच का तुमचे देशप्रेम? रोहित पवारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : दिवंगत मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटी रुपयांच्या रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मेजर अनुज सूद हे 2 मे 2020 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी लपून बसलेल्या स्थळावरून नागरिकांची सुटका करताना शहीद झाले होते. दिवंगत मेजर सूद यांच्या पत्नी आकृती सूद यांनी 2019 आणि 2020 च्या दोन सरकारी ठरावांतर्गत माजी सैनिकांना (आर्थिक) लाभ मिळावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात त्यावर सुनावणी झाली.

आम्हाला योग्य धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असून त्यासाठी मंत्रिमंडळाकडे जावे लागेल. पण आचारसंहितेमुळे मंत्रिमंडळाची बैठक सध्या होणार नाही, अशी माहिती सरकारी वकील पी पी काकडे यांनी या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाला दिली. मात्र, यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त करत, प्रत्येक वेळी निर्णय न घेण्यामागे काही ना काही कारण दिले जात असल्याचे सांगितले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण विशेष बाब म्हणून विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

याचसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. खेकड्याला (आरोग्यमंत्री तानाजी सावंत) 6500 कोटी रुपयांची दलाली मिळावी म्हणून आचारसंहिता लागण्याच्या बरोबर एक दिवस आधी टेंडर काढले जाते आणि दुसरीकडे शहीद जवानाच्या वीरपत्नीस मदत देण्यासाठी न्यायालयाने आदेश देऊनही आचारसंहिता आणि इतर तांत्रिक कारणे सांगतली जातात? हेच का तुमचे देशप्रेम? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा?

आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटी रुपयांचा रुग्णवाहिका खरेदी घोटाळा झाला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यापूर्वी केला आहे. याप्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. पिंपरी चिंचवडच्या सुमित फॅसिलिटी कंपनीला रुग्णवाहिका चालविण्याचा अनुभव नव्हता. मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेल्यावर एका स्पॅनिश कंपनीसोबत त्यांनी सुमित फॅसिलिटी कंपनीसोबत करार केला. त्यानंतर बीव्हीजी कंपनीचा देखील समावेश या कंत्राटात करण्यात आला. सुमित कंपनीने या कंत्राटासाठीचे निकष ठरवले आणि त्यानंतर स्वतःच टेंडर भरले, असा आरोप त्यांनी केला होता.


Edited by – Manoj S. Joshi

First Published on: April 16, 2024 4:00 PM
Exit mobile version