आमदार निवास्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन परंतु…, रोहित पवारांचे भातखळकरांना प्रत्युत्तर

आमदार निवास्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन परंतु…, रोहित पवारांचे भातखळकरांना प्रत्युत्तर

आमदार निवास्थानाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन परंतु..., रोहित पवारांचे भातखळकरांना प्रत्युत्तर

देशात कोरोना परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. देशात ऑक्सीजन, वैद्यकीय उपकरणे, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. देशात कोरोना परिस्थिती असाताना महाराष्ट्रात आमदार निवासस्थानाचे टेंडर काढले आहे तर केंद्र सरकारने पंतप्रधान निवास आणि संसद भवनाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. राज्यातील आमदार निवासस्थानावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता रोहित पवारांनी भातखळकरांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार रोहित पवार यांनी भातखळकरांना म्हटले आहे की, आपला मुद्दा मला योग्य वाटतो,पण टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही. टेंडर ते कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो,हे तुम्हाला माहीतच असेल!आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे, तरीही मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन. तुम्हीही २२ हजार कोटीचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि १३ हजार कोटीचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम पुढं ढकलून लसीकरणाकडं लक्ष देण्यासाठी केंद्राकडं पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल.

सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात, मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? असा टोलाही आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकरांचा रोहित पवारांवर निशाणा

आमदार निवासस्थानाच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना अशा शब्दात आमदार अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

First Published on: May 7, 2021 7:55 PM
Exit mobile version