पुढील १५ वर्षांत अखंड भारत बघायला मिळेल

पुढील १५ वर्षांत अखंड भारत बघायला मिळेल

पुढील १५ वर्षांत अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो बघायला मिळेल. हिंदूराष्ट्र हाच सनातन धर्म आहे. संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा अखंड भारत होईल, पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षांत अखंड भारत होईल, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते गुरुवारी हरिद्वारमध्ये बोलत होते.

मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षांत अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटले की, हिंदूराष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षांत पुन्हा अखंड भारत पाहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानते मग काय करणार? सनातन धर्माचा विरोध करणार्‍यांचेही आम्हाला सहकार्य आहे. जर त्यांनी विरोध करत आवाज उठवला नसता तर हिंदू जागा झाला नसता आणि झोपूनच राहिला असता. धर्माचे उत्थान होईल तरच भारताचे उत्थान होईल आणि याला विरोध करणारे संपतील, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले.

१५ दिवसांत करा – संजय राऊत
अखंड हिंदुस्थानाचे कोणाचे स्वप्न असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. २०१४, २०१९मध्ये भाजपाने याच मुद्यावर मते मागितली. आधी पाकव्याप्त काश्मीर आणि नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान ताब्यात घ्या आणि अखंड हिंदुस्थान निर्माण करा. तुम्हाला कोणी थांबवलेले नाही, पण आधी काश्मिरी पंडितांची घरवापसी सन्मानाने होऊ द्या. अखंड हिंदुस्थान १५ वर्षांत नाही, तर १५ दिवसांत करा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर दिली.

First Published on: April 15, 2022 5:43 AM
Exit mobile version