विधान परिषद विरोधी पक्षनेते शिंदे गटात जाण्याची चर्चा, अंबादास दानवे माध्यमांसमोर येऊन म्हणाले…

विधान परिषद विरोधी पक्षनेते शिंदे गटात जाण्याची चर्चा, अंबादास दानवे माध्यमांसमोर येऊन म्हणाले…

अंबादास दानवे शिंदे गटात जाण्याच्या अफवा, विरोधी पक्षनेत्यांनी स्वतः केले स्पष्ट

मुंबई – विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (opposition leader Ambadas Danve) हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. यावर स्वतः अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत, शिंदे गटात जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे. आमच्यातून गेलेले गद्दारच अस्वस्थ आहेत, त्यामुळे ते अशी वक्तव्य करत असल्याचे दानवेंनी म्हटले आहे.

मी कोणाच्याही संपर्कात नाही

अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा  आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलत असताना आमदार शिरसाट म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माझ्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे डोईजड झाल्याने त्रस्त असल्याचे अंबादास दानवे यांनी फोन करुन सांगितल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला.

यावर अंबादास दानवे यांनी मी कोणाच्याही संपर्कात नसल्याचे म्हटले आहे. शिंदे गटात जाण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले आहेत. शिंदे गटाचे आमदार असे दावे करत असतील तर हे त्यांच्या अस्वस्थतेचे लक्षण असल्याचेही दानवे म्हणाले. याच मेळाव्यात संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तर आदित्य ठाकरे हेही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. हे दावे हस्यास्पद असल्याचं विरोधी पक्षनेते दानवे यांनी म्हटलं आहे.

विधिमंडळात सर्वच एकमेकांना भेटतात. तिथे थोडेफार हाय-हॅलो झाले एवढाच काय तो शिंदे गटाच्या आमदारांशी झालेला संपर्क असं दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

संजय शिरसाट डिप्रेशनमध्ये
संजय शिरसाट यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये आहेत, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. संजय शिरसाट यांना गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे, मात्र त्यांची इच्छा अजून पूर्ण झालेली नाही. त्यांना वाटलं गद्दारी केल्यानंतर तरी मंत्री होता येईल मात्र तरीही ते मंत्री झालेले नाहीत. त्यामुळे नैराश्यातून ते असं बोलत असले पाहिजे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
मी संजय शिरसाट यांना फोन करावा असं माझं कोणतं काम त्यांच्याकडे अडकून पडले आहे, असं म्हणत त्यांनी फोन केल्याचंही नाकारलं आहे.

गद्दार सध्या अस्वस्थ 

दानवे म्हणाले, आमच्यातून गेलेले गद्दार सध्या अस्वस्थ आहेत. मी कोणाच्याही संपर्कात नाही. माझ्याशी कोणीही संपर्क केलेला नाही. किंवा मी कोणाशीही संपर्क केलेला नाही. विधिमंडळात सर्वांच्याच भेटी होतात. संजय शिरसाट यांच्यासोबत विधिमंडळात नमस्कार – चमत्कार झाला तेवढचं. शिंदे गटातीलच लोक माझ्या संपर्कात आहेत, मात्र मी त्यांच्यासारखे दावे करत नाही. विरोधकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. ती त्यांना बोलून दाखवता येत नाही, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर ती तुम्हाला स्पष्ट दिसू शकते. सुषमा अंधारे (Shushma Andhare) या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्या राज्यात फिरत असतात, त्यांचात आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा किंवा बेबनाव नाही, असेही स्पष्टीकरण दानवे यांनी दिले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकेर यांची खेड येथे झालेली सभा, ही जनता शिवसेनेसोबत असल्याचे सांगण्यासाठी पुरेसी असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.  यानंतर आता २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे. या सभेसाठी मराठवाड्यातून दोन लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक येतील असा दावा अंबादास दानवे यांनी केला. उद्धव ठाकरे यांची सभा झाली की त्याच शहरात एकनाथ शिंदे सध्या सभा घेत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेनंतर येत्या ८-९ एप्रिलला एकनाथ शिंदेंची ‘धनुष्यबाण यात्रा’ संभाजीनगर मधून सुरु होणार आहे, यावर दानवे म्हणाले, शिंदेच्या सभेला किती लोक येतात आणि ते कुठून-कुठून घेऊन येतात, ते पाहूया.

एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेतील ४० आमदार गेले आहेत. मात्र विधान परिषदेतील आमदारांना सोबत घेऊन जाण्यात त्यांना पहिजे तेवढे यश मिळालेले नाही. त्यामुळेच सरकार शिवसेनेचे (शिंदे गट) आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदही  शिवसेनेकडेच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अशी सध्या स्थिती आहे.

ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्याकडील जिल्हा प्रमुखपद सध्या काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा  आहे. त्यावर नाईक यांनी मात्र आपण ठाकरे गट सोडणार नसल्याचे वारंवार म्हटले आहे. वैभव नाईक आणि राजन साळवी यांची सध्या एसीबीसी चौकशी सुरु आहे. विधानसभे प्रमाणेच विधान परिषदेतही शिंदे गटाला आपले वर्चस्व हवे आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसोबतच आमदारांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

First Published on: March 27, 2023 1:23 PM
Exit mobile version