नाशिक बाजार समिती बंद ठेवण्याची अफवा

नाशिक बाजार समिती बंद ठेवण्याची अफवा

नाशिक बाजार समितीमध्ये कामासाठी जाणार्‍या अनेक हमाल, मजूर, मापारी, व्यापारी, आडतदार मोठ्या प्रमाणावर करोना बाधीत होत आहेत. बाजार समितीशी संबंधित नाशिक शहरात आतापर्यंत जवळपास दोनशे नागरिक करोना बाधीत झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस बाजार समिती बंद ठेवणार असल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरवलू जात आहे. याबाबत बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी तसा कुठलाही निर्णय झाला नसल्याचा खुलासा केला आहे.

नाशिक बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळभाज्या, कांदे, बटाटे व फळे यांचे लिलाव होतात. त्यासाठी मुंबईहून अनेक व्यापारी रोज येऊन फळे, भाजीपाला यांची खरेदी करतात. मे महिन्याच्या अखेरीस नाशिक बाजार समितीमधील एका व्यापार्‍याचा करोनामुळे मृत्यू झाला. तसेच तेथील हॉटेल चालकाच्या मुलालाही करोनाची बाधा झाली. यामुळे खडबडून जागे झालेल्या बाजार समिती, जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने बाजार समितीतील व्यवहार तीन दिवस बंद ठेवले. त्या काळात परिसराचे पूर्ण निर्जंतुकीकरण केले तसेच शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांचे पालन करून व्यवहार पूर्ववत केले.मात्र, बाजार समितीमधील सर्व घटकांची व्यवहारासाठी होणारी गर्दी टाळणे अशक्य असल्याने तेथील बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मागील पंधरा दिवसांत बाजार समितीशी संबंधीत जवळपास २०० करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी, मजूर यांनी बाजार समितीत जाणे टाळले आहे. व्यापार्‍यांची संख्याही कमी होत असून मोठ्या शहरांमधील व्यापारी, मॉल यांना नियमितपणे भाजीपाला पुरवणार्‍या पुरवठादारांनीही तात्पुरते काम थांबवले आहे. यामुळे बाजार समितीतील भाजीपाला आवकेवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुढील काही दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात येणांर असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्याने त्याबाबत या सर्व घटकांमध्ये संम्रम निर्माण झाला होता. दरम्यान नाशिक महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्याचा बाजार समितीचा विचार नसल्याचा खुलास बाजार समितीकडून करण्यात आला आहे.

नाशिक बाजार समितीमधील सर्व व्यवहार सुरळीत आहेत. नाशिक महापालिका आयुक्तांच्या सूचनांशिवाय बाजार समिती परस्पर कुठलेही निर्णय जाहीर करणार नाही. त्यामुळे नागरिकांनी व शेतकर्‍यांनी अशा अफवांना बळी पडू नये. तसेच शेतमाल विक्रीसाठ आणावा.
– अरुण काळे सचिव, बाजार समिती, नाशिक.

First Published on: June 17, 2020 3:00 PM
Exit mobile version