विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, शशिकांत शिंदे आघाडीवर 

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, शशिकांत शिंदे आघाडीवर 

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ तारीखला निवडणूक होत असून, सर्वच पक्षातून इच्छुकांची संख्या वाढत आहे. भाजपमध्ये तर माजी मंत्री विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. तर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार देखील निश्चित झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला विधान परिषदेवर पाठवणार याची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे ही दोन्ही नावे जरी आघाडीवर असली तरी देखील अमोल मिटकरी, महेश तपासे, नजिब मुल्ला हे देखील परिषदेसाठी इच्छुक आहेत.

यामुळे चाकणकर आणि शिंदे आघाडीवर

शशिकांत शिंदे यांना विधानसभेचा अनुभव असून, विरोधी बाकावर असताना सभागृहात त्यांनी देखील तेव्हाच्या फडणवीस सरकारवर प्रहार केला होता. त्यामुळे त्यांना सभागृहाचा अनुभव आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे असलेले वजन यामुळे शिंदे यांच्या नावाची जोरात चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शशिकांत शिंदे यांचा २०१९ च्या विधानसभेत पराभव झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना विधानपरिषदेत पाठवणार की प्रदेशाध्यक्ष करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा असून, त्या सुप्रिया सुळे यांच्या विश्वासू मानल्या जातात. तसेच रुपाली चाकणकर यांनी देखील चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एका बाजूने किल्ला लढवला होता. तसेच त्यांनी सोशल माध्यमातून देखील भाजपवर वारंवार हल्ला चढवला होता. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांनी चाकणकर यांचे नाव जवळपास निश्चित केल्याचे समजत आहे. सध्या विधान सभेचे पक्षीय बलाबल पाहिले तर भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. मात्र चौथ्या जागेसाठी देखील मित्र पक्षाच्या मदतीने भाजप जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजप चार जागा जिंकू शकते. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक अशा महाविकास आघडी एकूण ५ जागा जिंकू शकते. त्यामुळे जर हा विचार केला तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध देखील होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचेही उमेदवार ठरले, पण काँग्रेसमध्ये डझनभर इच्छुक

विशेष बाब म्हणजे शिवसेनेने आपले विधान परिषदेसाठी दोन्ही उमेदवार निश्चित केले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग देखील सुरु आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे उमेदवार या आठवड्यात जाहीर होतीलही मात्र काँग्रेसमध्ये अजूनही काही ठरले नसल्याचे समजत आहे. त्याचे कारण म्हणजे ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपापल्या मर्जीतील जवळपास डझनभर नावे सुचवली आहेत. या डझनभर इच्छुकांमध्ये काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे आघाडीवर आहेत.

First Published on: May 5, 2020 2:58 PM
Exit mobile version