राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त करा…

राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त करा…

बहुप्रतिक्षीत अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाकडे सध्या सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखामधून राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल असं म्हटलं आहे.

“उझबेकिस्तानमधून आलेल्या बाबराने हिंदू देवळे उद्ध्वस्त केली. त्यातून रामजन्मभूमीही सुटली नाही. त्यामुळे बाबराचा अयोध्येशी संबंध हा आक्रमणापुरताच होता. ते आक्रमण आणि बाबरीचे अतिक्रमणही लाखो कारसेवकांनी उद्ध्वस्त केले. त्यात शिवसेना होती. अनेकांचे योगदान त्यात आहे. आज विरोधाभास कसा आहे तो पहा. बाबरी तोडून जेथे राममंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते आडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा! बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल. बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही. या सर्व अडचणींवर मात करून ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन होत आहे,” असं अग्रलेखात म्हटंल आहे.


हेही वाचा – धारावीकर करणार प्लाझ्मा दान…


 

First Published on: July 22, 2020 8:52 AM
Exit mobile version