जगभरातून आलेली मदत देताना केंद्राकडून महाराष्ट्रासोबत भेदभाव, काँग्रेसची टीका

जगभरातून आलेली मदत देताना केंद्राकडून महाराष्ट्रासोबत भेदभाव, काँग्रेसची टीका

अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक! - सचिन सावंत

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती पाहता बाहेरी देशांकडून वैद्यकीय मदत पुरवण्यात येत आहे. आतापर्यंत ४० पेक्षा अधिक देशांनी भारताला मदत पुरवली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. आंतरराष्ट्रीय देशांनी केलेल्या मदतीचे वितरण करण्यामध्येही महाराष्ट्राला सोडून भाजपशासित राज्यांना करण्यात आले आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राला वगळता उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गुजरातमध्ये मदतीचे वितरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. सचिन सावंत यांनी म्हटले आहे आहे की, 40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजपा शासित युपी, बिहार,एमपी, हरियाणा, गुजरात इ.राज्ये आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उत्तर द्या, मोदी सरकारचा जाहीर निषेध आहे असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सदर आंतरराष्ट्रीय मदतीवर राज्य सरकारांचाही हक्क असताना ती थेट राज्यांना का दिली जात नाही? केवळ केंद्रीय यंत्रणांकडून त्याचे होणारे वाटप हे #PMCares प्रमाणे मोदींच्या हातात अमर्याद अधिकार देणारे आहे तसेच ते संघराज्य पध्दतीला छेद देणारे असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासात ४ लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे देशाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. लसीकरण मोहिम सुरु असून लसीच्या तुटवड्यामुळे अनेक राज्यात मोठ्या प्रमाणावर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिलाही डोस मिळाला नाही आहे.

First Published on: May 7, 2021 6:27 PM
Exit mobile version