सचिन वाझेंच्या स्टेटसमधलं २००४ प्रकरणं नेमक आहे तरी काय?

सचिन वाझेंच्या स्टेटसमधलं २००४ प्रकरणं नेमक आहे तरी काय?

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणामुळे अडचणीत आलेल्या सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचदरम्यान, वाझे यांनी व्हॉट्सअप स्टेटस अपडेट केला असून त्यात त्यांनी “२००४ मध्ये मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं. आताही तसचं काहीसं होत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. जगाला निरोप देण्याची वेळ आली आहे असं स्टेट्स ठेवलंय. यामुळे खळबळ उडाली असून वाझे २००४ सालच्या कोणत्या प्रकरणाबद्दल बोलत आहेत. यावर चर्चा सुरू झाली आहे.

२००४ प्रकरणं नेमक आहे तरी काय?

२ डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात दोण जणांचा मृत्यू झाला तर ३९ जण जखमी झाले होते. यावेळी आठजणांना अटक करण्यात आली होती. त्यात ख्वाजा युनूस (२७) या व्यवसायाने इंजिनियर असलेल्या तरूणाचाही समावेश होता. युनूस मूळचा परभणीचा होता पण दुबईत नोकरी करत होता. २५ डिसेंबर २००२ ला त्याला पकडण्यात आले होते. पोटा अंतर्गत त्यांना अटक करण्यात आले होते. ६ जानेवारीला घाटकोपर पोलीस ठाण्यात युनूससह अन्य तीनजणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर युनूस कोणाला दिसलाच नाही. ७ जानेवारीला तो फरार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चौकशीसाठी औरंगाबादला नेत असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. याच संधीचा गैरफायदा घेत युनूस तिथून पळून गेला. असा दावा पोलिसांनी केला.

मात्र, युनूसबरोबर असलेल्या त्याच्या साथीदाराने पोलिसांनी युनूसला नग्न करून बेदम मारहाण केल्याचे सांगितले. तसेच त्याच्या तोंडातून रक्त येत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यानंतर युनूसच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केलं. सीआयडीच्या तपासात युनूसचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाल्याचे समोर आले. तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्या व पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप ठेवण्यात आला. २००४ साली वाझे यांच्यासह अन्य तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. मात्र २०१८ नंतर याप्रकरणी सुनावणी झालीच नाही.

यादरम्यान , वाझे यांनी २००७ साली राजीनामा दिला. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण पोलीस विभागाने वाझेंचा राजीनामा स्विकारला नाही.

२०२० साली ठाकरे सरकार आल्यानंतर वाझे पुन्हा पोलीस दलात सक्रीय झाले. तर दुसरीकडे घाटकोपर बॉम्ब हल्ला प्रकरणातील सातजणांची सुटका करण्यात आली असून आज यूनुस जिवंत असता तर तोही सुटला असता असे युनूसच्या आईने म्हटले आहे. तर युनूस प्रकरणात ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. ते पुन्हा पोलीस दलात सक्रिय झाले आहेत. त्यात सचिन वाझेंचाही समावेश आहे.

First Published on: March 13, 2021 4:54 PM
Exit mobile version