लोकसभा तिकिटासाठी सदाभाऊंची लॉबिंग; महाराष्ट्रासह दिल्लीच्या नेत्यांच्याही भेटीगाठी

लोकसभा तिकिटासाठी सदाभाऊंची लॉबिंग; महाराष्ट्रासह दिल्लीच्या नेत्यांच्याही भेटीगाठी

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष कामाला लागले असून, लवकरच युती आणि आघाडीचा निर्णय होईल. मात्र युती आणि आघाडीच्या निर्णयावर देव पाण्यात टाकून बसलेले उमेदवार सध्या मात्र तिकिटासाठी आपापल्या नेत्यांकडे लॉबिंग करताना पहायला मिळत आहे. यामध्ये आता राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील मागे राहिलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले मतदार संघातून तिकीट मिळावे, यासाठी सदाभाऊ खोत यांनी आता पासूनच लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ते तिकिटासाठी सेटिंग लावत असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी चक्क दिल्ली गाठल्याची चर्चा आहे. दरम्यान याबद्दल सदाभाऊ खोत यांना विचारले असता मी हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छक असलो तरी मी दिल्लीत खासगी कामानिमित्त केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती.

युती झाली तर तिकीट धोक्यात

विशेष म्हणजे युतीवर सदाभाऊ खोत यांचे तिकीट अवलंबून असून, युती झाल्यास ती जागा शिवसेनेसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी यावेळी हातकणंगलेची जागा शिवसेना लढेल, असे सांगितले होते. त्यामुळे जर ही जागा शिवसेनेला गेली तर सदाभाऊ खोताना या जागेवर पाणी सोडावे लागेल.

म्हणून हवी सदाभाऊंना हातकणंगलेची जागा

सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना क्षह देण्यासाठी ही जागा लढवण्याची इच्छा सदाभाऊ यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याबद्दल सदाभाऊ खोत यांना विचारले असता त्यांनीही ही जागा आपण लढविणार असल्याचे सांगीतले.

मागील तीन वर्षांपासून मी या मतदार संघात काम करत आहे. अनेक योजना आणि सरकारी कार्यक्रम मी या तालुक्यात राबवले. त्यामुळे मला वाटते की मी या भागातून निवडणूक लढवावी. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितले आहे. आता निर्णय ते घेतील. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. – सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

First Published on: February 8, 2019 7:31 PM
Exit mobile version