साळाव रेवदंडा खाडी पुलाला भेग!

साळाव रेवदंडा खाडी पुलाला भेग!

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यांना जवळ आणणार्‍या कुंडलिका खाडीवरील साळाव रेवदंडा पुलाला भेग पडली आहे. त्यामुळे भरपावसात सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक पुलांची दुरवस्था झाली असली तरी त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव आणि साखर खाडी पूल या दोन महत्त्वाच्या पुलांची दुरवस्था झाली आहे. या पुलांची दुरवस्था झाल्यामुळे पुन्हा एकदा रोहा, मुरूड आणि अलिबाग या तीन तालुक्यांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटण्याची शक्यता आहे. साळाव -रेवदंडा खाडी पुलाचे काम हे १९८६ साली करण्यात आले असून या पुलाची लांबी ५१० मीटर एवढी आहे. या पुलाला बारा गाळे आहेत.

काही वर्षापूर्वी या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी स्पष्ट दिसत होते. मात्र त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी [पत्रा ] लावून त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डेदेखील बुजविण्यात आले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी परत भेग पडली आहे. त्याचप्रमाणे पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहेत. तीन ते चारवेळा रोहे तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेट्टीवर जाणार्‍या दगडी कोळशाच्या अवाढव्य बार्जने धडक मारल्याने हा पूल अधिकच कमकुवत झाला आहे.

First Published on: June 13, 2019 4:15 AM
Exit mobile version