Salman Khan : सत्ता हे जनसेवेचे नसून स्वार्थाचे साधन, सचिन सावंत यांची टीका

Salman Khan : सत्ता हे जनसेवेचे नसून स्वार्थाचे साधन, सचिन सावंत यांची टीका

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून पळ काढला. या घटनेनंतर त्याच्या घराबाहेरचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. (Salman Khan firing : Sachin Sawant targets state govt)

लमान खान याच्या वांद्रेस्थित घराबाहेर आज, रविवारी पहाटे गोळीबार झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान घरीच होता, असे सांगण्यात येते. सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. बिश्नोई गँगच्या टार्गेटवर नेहमीच सलमान खान राहिला आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे. अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराची घटना महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची भयावह स्थिती दर्शवते. सलमानला गेले दोन वर्षे सातत्याने धमक्या येत होत्या. त्याने आयुक्तांची भेटही घेतली होती. मग आजवर पोलिसांनी काय केले? का गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

पोलिसांची ही बेफिकीरी असेल तर निष्क्रिय पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. सलमान हा मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक आहे. त्याची ही अवस्था तर जनसामान्यांचे काय? गुन्हेगार आता बेफाम झाले असून त्यांना भीती राहिली नाही. राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सध्याचे प्रशासन अंतर्गत राजकीय कुरघोडी हाताळण्यात, तपास यंत्रणांद्वारे विरोधकांना धमकवण्यात आणि त्यांचा आवाज शांत करण्यात व्यग्र आहे. त्यांच्यासाठी, सत्ता हे जनसेवेचे नसून स्वार्थाचे साधन आहे, असेही त्यांनी सुनावले आहे.

अनमोल बिश्नोईने घेतली जबाबदारी

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी सध्या तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने स्वीकारली आहे. अनमोल बिश्नोईने रविवारी दुपारी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. सलमान खान आम्ही हे फक्त तुला ट्रेलर दाखवण्यासाठी केले आहे. आमच्या ताकदीची आणखी परीक्षा घेऊ नकोस. हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे. यानंतर नुसत्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत, असा इशारा त्याने दिला आहे.

हेही वाचा – Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार म्हणजे भाजपा सरकारची पोलखोल; राऊतांचं टीकास्त्र

First Published on: April 14, 2024 6:37 PM
Exit mobile version