‘सॅल्यूट शर्मिष्ठा वालावलकर !’ : नाशिक एसीबीची धडाकेबाज कारवाई

‘सॅल्यूट शर्मिष्ठा वालावलकर !’ : नाशिक एसीबीची धडाकेबाज कारवाई

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठ वालावलकर यांनी पाच महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक विभागाचा पदभार स्विकारला. या कालावधीत त्यांनी धडाकेबाज कामगिरी करत तब्बल ८१ ठिकाणी छापे टाकून ९० जणांना लाच घेताना अटक केली. या कारवाईत संशयितांनी तब्बल पाच कोटी रूपयांहून अधिक लाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

पथकांच्या कारवायांमुळे तक्रारदारांचा विश्वास बसला आहे. त्यामुळे या विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. अनेक छापे सुटीच्या दिवशीही टाकण्यात आले. ८१ छाप्यांमध्ये सर्वाधिक छापे महसूल विभागातील असून, त्याखालोखाल पोलीस विभागातील आहेत. लाचखोरीमध्ये वर्ग १ व वर्ग २ मधील अधिकारी वर्ग ३ व खासगी व्यक्तींमार्फत लाच स्विकारत असल्याचे समोर आले. शेतजमिनीच्या हिस्सा नमुना बारा या कागदावरील चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अतिरिक्त उपसंचालक महेशकुमार शिंदेंसह कनिष्ठ लिपिक अमोल महाजन यांना लाच घेताना अटक करण्यात आली.

तक्रारदाराविरोधात सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात तब्बल २० लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निफाडचे तालुका सहायक निबंधक रणजित महादेव पाटील व त्यांचे वरिष्ठ लिपिक अशा दोघांना लाच घेताना अटक केली. ऑगस्ट २०२२ मध्ये मध्यान्ह भोजन योजनेचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपयांच्या कामाचा कार्यादेश देण्यासाठी आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला २८ लाख लाच स्विकारताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी ३० लाखांची लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे. ही नाशिकमधील सर्वात मोठी कारवाई आहे.

First Published on: May 16, 2023 12:30 PM
Exit mobile version