शरद पवार नानांना छोटा माणूस मानतात हीच त्यांच्या कार्यकुशलतेची पोचपावती – शिवसेना

शरद पवार नानांना छोटा माणूस मानतात हीच त्यांच्या कार्यकुशलतेची पोचपावती – शिवसेना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. नानांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नानांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं. दरम्यान, नाना पटोलेंच्या स्वबळाचा नारा तसंच गेले काही दिवस करत असलेल्या वक्तव्यांवरुन शिवसेनेने ‘सामना’तील अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

“नानांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून काँग्रेसला जमिनीवरून हवेत आणले. काँग्रेस त्यामुळे घोंघावत आहे. नाना बोलतात व काँग्रेस घोंघावते किंवा डोलते. शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. “नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार ‘स्वबळा’स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे,” असं देखील शिवसेनेने म्हटलं आहे.

होऊ द्या खळबळ!

“नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ!” असं शिवसेनेने सामनातून म्हटलं आहे.

काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच

“नाना पटोले हे मोकळय़ाढाकळय़ा स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो. मग लोकांना वाटते आता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार. तीन पक्षांत वाद, फाटाफूट होणार व सरकार पडणार, पण तसे काहीच घडत नाही व नाना त्यांच्या पुढच्या कामास म्हणजे बोलण्यास लागतात. आता पुन्हा नानांच्या ताज्यातवाण्या वक्तव्याने चहाच्या पेल्यातले वादळ निर्माण झाले असे म्हणतात. लोणावळय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी ‘ताव’ मारला की, ‘आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही.’ नाना पुढे असेही म्हणाले की, ‘काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे’. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे,” असं अग्रलेखात म्हटलं आहे.

नानांच्या बोलण्यावर सरकारचे भवितव्य अवलंबून नाही

“नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे. नानांवर पाळत ठेवली जात आहे, असे त्यांना वाटते. कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी ‘पाळत’ ठेवण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला. फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर पाळत ठेवण्यात आली. महत्त्वाच्या नेत्यांचे फोन ‘टॅप’ करण्यात आले. त्यात नानाही होते. आता या प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱया प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले,” असा दावा शिवसेनेने केला आहे.

 

First Published on: July 14, 2021 10:34 AM
Exit mobile version