संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पुणे जिल्ह्यात नो एन्ट्री

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पुणे जिल्ह्यात नो एन्ट्री

मिलिंद एकबोटे,संभाजी भिडे

कोरेगाव-भीमाच्या लढाईला येत्या 1 जानेवारीला 202 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने इथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन समारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी 160 जणांना नोटीस बजावली आहे. यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचाही समावेश आहे. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हात बंदी घालण्यात आली आहे.

पोलिसांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना 28 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमाच्या लढाईला 200 वर्षे पूर्ण झाली होती. यावेळी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमले होते. परंतु, या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. त्यामुळे यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी (22 डिसेंबर) या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हा बंदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. बैठकीला पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे तसेच भीमा कोरेगाव, पेरणे, वढू बुद्रुक आदी गावांतील नागरिक उपस्थित होते.

First Published on: December 24, 2019 5:14 AM
Exit mobile version