अंजली दमानियांच्या आरोपांवर समीर भुजबळांचा खुलासा, म्हणाले – “हा त्यांचा मीडिया स्टंट”

अंजली दमानियांच्या आरोपांवर समीर भुजबळांचा खुलासा, म्हणाले – “हा त्यांचा मीडिया स्टंट”

दमानिया वि. भुजबळ, सांताक्रूझमधील जागेवरून दिले प्रत्युत्तर

मुंबई : शुक्रवारी (ता. 17 नोव्हेंबर) जालन्यातील अंबड येथे ओबीसींची महाएल्गार सभा पार पडली. या सभेत सराकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाषण केले. परंतु, या भाषनानंतर त्यांच्यावर अनेकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील काल शनिवारी (ता. 18 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काल अंजली दमानिया मुंबईत भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेणार होत्या; पण पोलिसांनी त्यांना अटकाव केला.

हेही वाचा – अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात; भुजबळांविरोधात करणार होत्या मोठा खुलासा

यानंतर दमानिया यांनी आपल्‍या घरीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, “मी आज दाखवणार होते की, मंत्री छगन भुजबळ यांची सांताक्रुझमधील टोलेजंग इमारत ही त्यांची नाही आहे तर लुबाडलेल्या जागेवर उभी आहे, मूळ जागा मालकाला अद्याप एक पैसाही मिळालेला नाही. असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु, दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर आता भुजबळ कुटुंबियांकडून खुलासा करण्यात आला आहे. तर याबाबतचा आणखी आणि सविस्तर खुलासा स्वतः छगन भुजबळ करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Sameer Bhujbal’s disclosure on Anjali Damania’s allegations)

अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले की, सांताक्रूझ येथील आमच्या निवासस्थानाच्या जागेबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. मात्र सदर जागा ही बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते, ही वस्तुस्थिती आहे. तर, फ्रान्सिस फर्नांडिस यांनी या लिझचे हक्क हे त्यांची मुलगी म्हणजेच शैला अथायडे ह्यांना दिले होते. म्हणजेच त्या ह्या जागेच्या खऱ्या मालक आहेत. ह्या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबीयांनी कन्सेंट टर्म्स फाईल करून सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स ह्या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. त्यांनी 10 वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे फर्नांडिस दाम्पत्य हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते. या कामासाठी त्यांनी फ्रेडरिक नर्होणा ह्या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधावा ह्यासाठी विनंती केली. त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या संपर्कात ते आले. त्यांनी सर्व विषय आमच्या कंपनीसमोर मांडला. त्यानुसार फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा मेसर्स पाल्म शेल्टर्स व फ्रेडरिक नर्होणा ह्यांना दिला होता. त्याबदल्यात सादर जागेसंबंधी सर्व हक्क आमच्या कंपनीस मिळाले होते.

त्यावेळी मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर 2003 मध्ये फर्नांडिस दाम्पत्याने आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे रजिस्टर POA सुद्धा केली होती. परंतु 2005 मध्ये आम्ही बांधकामास सुरुवात केल्यानंतर आमचे फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी पटत नाही, ह्या कारणास्तव तो करार रद्द करावा अशी भूमिका फर्नांडिस यांनी घेतली. आम्ही फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी संपर्क केला असता बांधकाम सुरू आहे व लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र फेड्रिक नर्होणा यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनीच नकार दिला, अशी माहिती समीर भुजबळ यांच्याकडून देण्यात आली आहे.

तसेच, यानंतर आमचे कोणतेही देणे लागत नसताना देखील माणुसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबीयांशी आम्ही वारंवार संपर्क केला. 2014 साली त्यांनी समक्ष भेटून फ्लॅटच्या मोबदल्यात पैसे देण्याचे आम्ही मान्य केले आणि त्यांनी देखील ते मान्य केले. त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्टला पत्र सुद्धा दिले की, परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. मात्र त्यावेळेस देखील फर्नांडिस यांनी व्यवहार पार पाडला नाही आणि पुन्हा पैसे घेण्यास नकार दिला. नंतरच्या काळात आमच्यावर ओढवलेली संकटे पाहत याबाबत फर्नांडिस कुटुंबीय कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि त्यांना ट्र्याबूनल (योग्य त्या कोर्टात दाद मागायला) मध्ये जायला सांगितले. मात्र त्यानंतर देखील त्यांनी ट्र्याबूनलमध्ये दाद मागितली नाही, असा खुलासा समीर भुजबळ यांनी केा आहे.

तर, यानंतर अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना पुढे करून यात राजकारण करत राहिल्या. त्यांना पुढे करून फर्नांडीस कुटुंबियांना कोणताही लाभ घेऊ दिला नाही. आमची तयारी असताना देखील फर्नांडीस कुटुंबीयांनी व्यवहार पार पाडला नाही. यानंतर या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी मध्यस्ती केल्याची विनंती करण्यात आल्यानंतर आम्ही या प्रकरणावरून सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर क्लाउड फर्नांडिस यांचे निधन झाल्याचे आम्हाला समजाताच सुरुवातीलाच 50 लाख रुपयांचा धनादेश आम्ही विनाअट देऊ केला. तो त्यांनी स्वीकारला, परंतु बँकेत जमा केला नाही किंवा त्यांना जमा करू दिला नसावा, असा थेट आरोपही समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आला आहे.

सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आम्ही लढत आहोत. शुक्रवारी झालेली सभा पाहता यात राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मीडिया स्टंट केला. आमचे देणे लागत नसतानाही माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली. मात्र तरी देखील दमानिया यात राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत आहेत, असा उलट आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी माहिती ही भुजबळांकडून पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार आहे.

First Published on: November 19, 2023 9:16 AM
Exit mobile version