‘समीर दाऊद वानखेडे’, जन्माचा दाखला शेअर करत नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा हल्लाबोल

‘समीर दाऊद वानखेडे’, जन्माचा दाखला शेअर करत नवाब मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा हल्लाबोल

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला शेअर केला आहे. यामध्ये समीर दाऊद वानखेडे असं लिहिलेलं आहे. तसंच, समीर वानखेडे यांचा जुना फोटो देखील शेअर करत पहचान कौन? असं म्हटलं आहे. नवाब मलिक यांच्या नव्या गौप्यस्फोटानंतर खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “मी सहा तारखेपासून समीर दाऊद वानखेडे हे गृहस्थ बोगस केसेस तयार करत आहेत, असं सांगत आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करुन पैसे गोळा करण्याचे काम मुंबईमध्ये सुरु आहे. सुरुवातीला आम्ही किरण गोसावी, मनीष भानुशाली प्रकरण पुढे आणलं. मग भाजपच्या नेत्याचा मेव्हणा, तीन लोकांना सोडण्याचा विषय, फ्लेचर पटेलचा विषय, त्यानंतर मालदीवमध्ये फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांकडून पैसे कसे उकळे हे आम्ही पुढे आणले. भाजपचे लोकं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते,” असं नावब मलिक म्हणाले.

“रविवारी ज्या प्रकारे एनसीबीचा एक नंबरचा पंच प्रभाकर साईल याने मिनट टू मिनट काय घडलं याची माहिती दिली आहे. आम्ही एनसीबीवर कधी आरोप केलेला नाही. पण एखादा अधिकारी येऊन सगळी यंत्रणा बदनाम करतं हे सत्य परिस्थिती आहे. मी स्वत: जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेणार आहे आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणार आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

“बरेच लोक मुंबईत खंडणी गोळा करत आहेत, भीती निर्माण करत आहेत. हा गंभीर विषय आहे. मी जेव्हा बोललो हा बोगस माणूस आहे तेव्हा लोकं माझ्यावर प्रश्न निर्माण करत होते. आज मी त्यांचा जन्माचा दाखला ट्विटरवर शेअर केला आहे. ते त्यांनी लपवून ठेवलं होतं. दोन महिने प्रयत्न करुन हे पुरावे आम्ही काढलेले आहेत. त्यात त्यांच्या आईचे नाव आहे, वडिलांचे नाव – दाऊद वानखेडे यांचं नाव त्यामध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यावर खोडाखोड करण्याची सुरुवात २० वर्षानंतर सुरु झाली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आम्ही जनतेसमोर ठेवला आहे. याआधीच बोगसगिरी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.

“मनसुख हिरेनच्या हत्येनंतर अधिकाऱ्यांकडून काहीही होऊ शकतं ही लोकांच्या मनात भीती आहे. जो फरार आरोपी आहे किरण गोसावी तो गायब आहे. प्रभाकर साईलचं म्हणणं आहे की कुठे यांनी त्याला ठेवलं आहे? त्याच्या मनात शंका आहे की त्याची हत्या झाली की काय? याला पण असं वाटतंय की त्याची पण हत्या होऊ शकते. त्यांनी भीती बोलून दाखवली आहे. निश्चितपणे ज्यांना भीती वाटत असेल तर त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी देण्याचं सरकारचं कर्तव्य आहे,” असं नवाब मलिक म्हणाले.

 

First Published on: October 25, 2021 1:20 PM
Exit mobile version