Sangli Lok Sabha 2024 : अर्ज मागे घ्या अन्यथा…; विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

Sangli Lok Sabha 2024 : अर्ज मागे घ्या अन्यथा…; विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

सांगली : लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतरही महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा मतदारसंघातील तिढा कायम आहे. सांगली मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहे. पण काँग्रेसला या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी वेगळा उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, आता विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. (Sangli Lok Sabha Constituency Vishal Patil Congress warns)

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते विशाल पाटील निवडणूक लढवण्यसाठी इच्छूक होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सांगलीतील नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली. यामध्ये सांगलीचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम देखील होती. मात्र, मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम ठेवण्यात आला. त्यामुळे विशाल पाटील यांनी सांगलीतून शक्तिप्रदर्शन उमेदवारी अर्ज भरला.

हेही वाचा – Thackeray Group : …ही तर परिवर्तनाची नांदी; ठाकरे गटाची केंद्र सरकारवर टीका

ऐन लोकसभेच्या तोंडावर महाविकास आघाडीत कटुता निर्माण होऊ नये म्हणून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे जाहीर केले. मात्र, तरीही काँग्रेसचे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी बाळासाहेब थोरात सांगलीत जाणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. सांगलीत तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, इथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी शेवटची मुदत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील यांची समजूत काढण्यात यश मिळेल, असे वक्तव्य केले. त्यानुसार, ‘विशाल पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून सर्व गोष्टी पुढे व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्हाला नक्की यश मिळेल’, असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा – Thackeray Group : राज्यकर्त्यांची थापेबाजी हाच….; केंद्र सरकार, निवडणूक आयोगावर ठाकरे गटाची टीका

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 22, 2024 12:27 PM
Exit mobile version