धनंजय मुंडे यांच्या जागेवर महाविकास आघाडीचे संजय दौंड आमदार

धनंजय मुंडे यांच्या जागेवर महाविकास आघाडीचे संजय दौंड आमदार

संजय दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर त्यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी २४ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होणार होती. त्यासाठी महाविकास आघाडीकडून संजय दौंड तर भाजपकडून राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र आज राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दौंड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. हा भाजपला एक प्रकारचा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार करणार मतदान करणार होते. मात्र संख्याबळ नसल्याने भाजपाने माघार घेतली आहे.

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जुने संबंध असून संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं आहे. शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. तो शब्द राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा देऊन पूर्ण केला आहे. धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत होती, त्यामुळे दौंड यांना किमान तीन वर्ष आमदार मिळतील.

दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या संजय दौंड यांच्या रूपाने बीड जिल्ह्यात आणखी एक आमदारकी आली असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मिळुन काम करू असे म्हणत आनंद व्यक्त केला आहे. परळी तालुक्याला आणखी एक आमदार मिळाला याचा विशेष आनंद असल्याचे सांगत मुंडे यांनी पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

 

First Published on: January 17, 2020 4:54 PM
Exit mobile version